Hemant Soren Arrest : हेमंत सोरेन अटक प्रकरणी झारखंड उच्‍च न्‍यायालयाची ‘ईडी’ला नोटीस | पुढारी

Hemant Soren Arrest : हेमंत सोरेन अटक प्रकरणी झारखंड उच्‍च न्‍यायालयाची 'ईडी'ला नोटीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवार, ३१ जानेवारी राेजी अटक केली हाेती. तत्पूर्वी त्यांनी झारखंडच्या राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्त केला होता. दरम्यान अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण झारखंड उच्च न्यायालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयाने ‘ईडी’ला नाेटीस बजावत या कारवाई प्रकरणी उत्तर देण्‍यास सांगितले आहे. (Hemant Soren Jharkhand High Court Arrest)

माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अटकेला आव्हान देणारी याचिका झारखंड उच्च न्यायालयात दाखल केली हाेती. यावर आज (दि.५) न्यायालयात सुनावणी झाली.  झारखंड उच्च न्यायालयाने ईडीकडून या प्रकरणात उत्तर मागितले आहे. तसेच न्यायालयाने शुक्रवार ९ फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयातील पुढील सुनावणी सोमवार १२ फेब्रुवारीला होणार आहे. (Hemant Soren Arrest)

हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची ईडी कोठडी

जमीन फसवणूक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ५ दिवसांची ईडी कोठडीत सुनावण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. दरम्यान, ईडीने केलेल्या अटकेच्या विरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना झारखंड उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते, यानुसार सोरेन यांनी आता झारखंड उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Hemant Soren Arrest)

काय आहे नेमकं प्रकरण?

ईडी हेमंत सोरेन यांची चौकशी रांचीमधील बडगई भागातील लष्‍कराच्‍या मालकीच्‍या ४.५५ एकर जमिनीच्‍या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. या प्रकरणी महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीने सोरेन यांना १४ ऑगस्ट २०२३ रोजी पहिले समन्स जारी केले होते. यानंतर सोरेन यांना सात समन्स बजावले होते पण ते तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. अखेर २० जानेवारीला आठव्‍या समन्सनंतर त्यांनी आपले म्हणणे नोंदवले. या प्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक झाली आहे. यामध्‍ये २०११ बॅचचे आयएएस अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे.

हेही वाचा:

Back to top button