पुढारी ऑनलाईन डेस्क: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना दोन दिवसापूर्वी ईडीने अटक केली. यानंतर आज (दि.२) झामुमो चे उपाध्यक्ष आणि हेमंत यांचे मोठे भाऊ चंपाई सोरेन यांनी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी चंपाई यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत झारखंड काँग्रेसचे आलमगीर आलम आणि राजदचे सत्यानंद भोक्ता यांनी देखील राज्य कॅबिनेट मंत्री म्हणून आज शपथ घेतली. यानंतर चंपाई सोरेन यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Jharkhand New CM)
झारखंड मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चंपाई सोरेने यांनी माध्यमांना पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, हेमंत सोरेन यांनी आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या कामाला मी गती देईन. तसेच राज्यातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम वेळेत पूर्ण करू, असे देखील चंपाई यांनी स्पष्ट केले. (Jharkhand New CM)
हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमध्ये 'झामुमो'चे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, राज्यात युतीच्या बळावर अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला आहे, असे देखील झामुमो पक्षाचे उपाध्यक्ष आणि झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Jharkhand New CM)