Jharkhand New CM: ‘झामुमो’ नेते चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध | पुढारी

Jharkhand New CM: 'झामुमो' नेते चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध

पुढारी ऑनलाईन डेस्क : जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. तत्पूर्वी त्यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा होता. यानंतर चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्‍यमंत्री होतील, अशी घोषणा झाली होती. या पार्श्वभूमीवर चंपाई सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर ‘झारखंड मुक्ती मोर्चा’चे नेते चंपाई सोरेन यांनी आज रांची येथील राजभवनात नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. (Jharkhand New CM) चंपाई सोरेन यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

‘झामुमो’ उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांच्यासोबतच काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि राजदचे सत्यानंद भोक्ता यांनी देखील राज्य कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. परंतु झारखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री चंपाई यांना राज्यपालांनी १० दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. (Jharkhand New CM)

Jharkhand New CM : चंपाई सोरेन झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री

‘झारखंड मुक्ती मोर्चा’ विधीमंडळ पक्षाने नेते चंपाई सोरेन हे एक भारतीय राजकारणी आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. यानंतर ते झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले. आज २ फेब्रुवारी २०२४ पासून झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहेत. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे सदस्य आहेत आणि सेराईकेल्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व करत आहेत. दरम्यान त्यांच्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी असणार आहे.

चंपाई सोरेन यांचीच मुख्‍यमंत्रीपदी निवड कशी झाली ?

जमीन घोटाळा प्रकरणी अटक करण्‍यापूर्वीच हेमंत सोरेन यांनी त्‍यांचे मोठे बंधू चंपाई सोरेन यांची मुख्‍यमंत्रीपदी निवड होण्‍याचे संकेत दिले होते. झारखंडमधील सत्ताधारी महाआघाडीच्या आमदारांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्‍यांनी सोरेन यांना JMM विधिमंडळ पक्षाचे सुप्रीमो म्हणून घोषित केले. हेमंत सोरेनचे वडील शिबू सोरेन यांच्यासह चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. तसेच ते हेमंत सोरेन यांचे अत्‍यंत विश्वासू आहेत. त्‍याचबरोबर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोल्हान भागातील आहेत. याच भागातून राज्‍यातला आतापर्यंत तीन मुख्यमंत्री मिळाले आहेत. अर्जुन मुंडा (2010 ते 2013) आणि रघुवर दास (2014 ते 2019) यांच्यासह काँग्रेसचे मधु कोडा हे याच भागातून येतात. मागील म्‍हणजे २०१९ च्‍या विधानसभा निवडणुकीत कोल्‍हानमध्‍ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्‍यामुळेच चंपाई सोरेन यांना हेमंत सोरेन यांनी उत्तराधिकारी म्हणून निवडणे हा भाजपसाठी झारखंड मुक्‍ती मोर्चाने धक्‍कातंत्राचा वापर केल्‍याचे मानले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘टायगर ऑफ कोल्हन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंपाई सोरेन हे कोल्हान भागात आपले वर्चस्‍व राखण्‍यात यशस्‍वी होतील, असे मानले जात आहे

सोरेन यांना आणखी एक धक्का, याचिकेवर सुनावणीस ‘SC’चा नकार

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांच्या जमीन घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. हेमंत सोरेन यांना रांची येथील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केल्यानंतर एका दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर ही घटना घडली आहे. “न्यायालये सर्वांसाठी आहे. उच्च न्यायालये ही घटनात्मक न्यायालये आहेत. जर आपण एका व्यक्तीला परवानगी दिली तर आपल्याला सर्वांना परवानगी द्यावी लागेल,” असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाला विवेकाधीन अधिकार आहेत. “ही अशी बाब आहे जिथे विवेकाचा वापर केला पाहिजे.”

हेही वाचा:

 

 

Back to top button