Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत वाढ; २२ फेब्रुवारीला पुढील सुनावणी | पुढारी

Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत वाढ; २२ फेब्रुवारीला पुढील सुनावणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत पुढील सुनावणीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी सुनावणीसाठी राऊस एव्हेन्यू न्यायालयात आज (दि.५) त्यांना आणले होते. २२ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

काय आहेत आरोप ?

मनीष सिसोदीया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारीला अटक केली आहे. तेव्हापासून ते तुरूंगात आहेत. मद्य धोरण घोटाळ्यातील सिसोदिया यांच्या भूमिकेचा ‘ईडी’ तपास करीत आहे. वारंवार फोन बदलून पुरावे नष्ट करणे, मद्यविक्री करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांचे कमिशन ५ टक्क्यांवरून वाढवून १२ टक्के करणे, या बदल्यात लाच घेणे, दक्षिण भारतातील मद्य कार्टेलकडून आप नेता विजय नायरच्या माध्यमातून पैसे घेणे, आदी आरोप त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आले आहे. या घोटाळ्याची व्याप्ती आणि पैसा कसा आला, कसा गेला, या बाबींवर तपासाचा केंद्रबिंदू असल्याचे ईडीने स्‍पष्‍ट केले आहे.

नायब राज्‍यपालांनी केली होती सीबीआय चौकशीची शिफारस

दिल्‍लीतील नवीन मद्य धोरणातील भ्रष्‍टाचार प्रकरणी जुलै २०२२ मध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची शिफारस केली. सक्सेना यांनी सिसोदिया यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडी आणि सीबीआयने सिसोदियाविरुद्ध तपास सुरू केला होता.

 हेही वाचा:

Back to top button