अखेर मनीष सिसोदिया यांना अटक, मद्य घोटाळाप्रकरणी सीबीआयची कारवाई | पुढारी

अखेर मनीष सिसोदिया यांना अटक, मद्य घोटाळाप्रकरणी सीबीआयची कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर केंद्रीय गुन्हे अन्वेशन (सीबीआय) विभागाने आज सांयंकाळी (दि. २६) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली. मद्य घोटाळाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मद्य धोरण घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी आज (रविवार) हजर राहण्याचे निर्देश सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांना दिले होते. त्‍या पार्श्वभूमीवर आज मनीष शिसोदिया हे सीबीआयच्या कार्यालयात उपस्‍थित राहिले. याप्रकरणी सीबीआयने सलग आठ तास त्‍यांची चौकशी केली. अखेर त्‍यांना अटक करण्‍यात आली. दरम्‍यान, सिसोदिया यांच्या समर्थकांकडून तसेच आपकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता त्‍यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सीबीआय चौकशी दरम्यान केजरीवालांचे सिसोदियांसाठी भावनिक ट्विट

सीबीआय मुख्यालयात जाण्यापूर्वी मनीष सिसोदिया यांनी राजघाटावर पोहोचत महात्मा गांधींचे आशीर्वाद घेतले. यानंतर आपचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदियांना उद्देशून भावनिक ट्विट करत आधार दिला.
अरविंद केजरीवाल यांनी सिसोदियांनी सीबीआय चौकशीपूर्वी केलेल्या ट्विटला उत्तर देताना म्हटले आहे, “मनीष देव तुमच्या पाठीशी आहे. लाखो मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत. जेव्हा तुम्ही देशासाठी आणि समाजासाठी तुरुंगात जाता, तेव्हा तुरुंगात जाणे ही वाईट गोष्ट नाही, तो एक आशीर्वाद आहे. मी प्रार्थना करतो की, तुरुंगातून तुम्ही लवकर परत या. दिल्लीतील मुले, पालक आणि आम्ही सर्वजण तुमची वाट पाहत आहोत.

देशाची प्रगती कशी होणार?- अरविंद केजरीवाल

पुढे अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक ट्विट केले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे ती,  ज्या देशात गरीब मुलांना चांगले शिक्षण देणारे आणि त्या मुलांचे भविष्य घडवणारे तुरुंगात आहेत. तर दुसरीकडे कोट्यवधींचा घोटाळा करणारे पंतप्रधानांचे जवळचे मित्र आहेत, त्या देशाची प्रगती कशी होणार? असा प्रश्न सरकारला केला आहे. तसेच मनीष काळजी करू नका, आम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ; असे आश्वासन देखील केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांना दिले आहे.

 

Back to top button