‘मोफत धान्य’ वाटप योजनेचा विस्तार आणखी चार महिन्यांसाठी वाढवला | पुढारी

'मोफत धान्य' वाटप योजनेचा विस्तार आणखी चार महिन्यांसाठी वाढवला

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यात सुरु करण्यात आलेल्या ‘मोफत धान्य’ वाटप योजनेचा विस्तार आणखी चार महिन्यांसाठी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मार्च २०२२ पर्यंत मासिक ५ किलो गहू किंवा तितकेच तांदूळ मिळणार आहे.

मोफत धान्य वाटप योजनेचा लाभ आधीपासून राबविल्या जात असलेल्या अंत्योदय आणि इतर योजनांव्यतिरिक्त दिला जातो. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना प्रारंभिक टप्प्यात एप्रिल – जून २०२० या कालावधीत राबविण्यात आली होती.

त्यानंतर वरचेवर योजनेची मुदत वाढविण्यात आली होती. पुढील चार महिन्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेवर सुमारे ५३ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा समावेश राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यात करण्यात आलेला आहे. त्यानुसार देशभरातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य वाटप केले जाते. 80 कोटी लोकांसाठी दीर्घकाळ मोफत धान्य वाटपाची योजना राबविणारा भारत हा जगातला एकमेव देश आहे, असेही ठाकूर यांनी यावेळी नमूद केले.

हे ही वाचा :

Back to top button