Paytm अडचणीत, शेअर्स २० टक्क्यांनी गडगडले, कारण काय? | पुढारी

Paytm अडचणीत, शेअर्स २० टक्क्यांनी गडगडले, कारण काय?

पुढारी ऑनलाईन : पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडला गुरुवारच्या व्यवहारात मोठा फटका बसला. हा शेअर्स बीएसई सेन्सेक्सवर २० टक्क्यांनी घसरून ६०९ रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजेच आज या शेअर्सचे मुल्य १५२ रुपयांनी कमी झाले. रिझर्व्ह बँक इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन क्रेडिट आणि डिपॉझिट ऑपरेशन्स, टॉप-अप्स, फंड ट्रान्सफर आणि इतर बँकिंग ऑपरेशन्स फेब्रुवारी अखेरीस थांबवण्यास सांगितल्यानंतर वन ९७ कम्युनिकेशन्सचे शेअर्स २० टक्क्यांच्या घसरणीसह लोअर सर्किटमध्ये गेले.

 संबंधित बातम्या  

NSE वर देखील हा शेअर्स १९.९९ टक्क्यांनी घसरून ६०९ रुपयांच्या दिवसाच्या सर्वात कमी ट्रेडिंग परवानगी मर्यादेपर्यंत पोहोचला. यामुळे कंपनीचे बाजार भांडवल (mcap) सुरुवातीच्या व्यवहारात ९,६४६.३१ कोटी रुपयांनी कमी होऊन ३८,६६३.६९ कोटी रुपयांवर आले.

पेटीएम पेमेंट्स बँक ही भारतातील सर्वात मोठी पेमेंट फर्म Paytm चा एक भाग आहे. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला सांगितले की ते २९ फेब्रुवारीनंतर नवीन ठेवी घेऊ शकणार नाहीत. क्रेडिट व्यवहार करू शकणार नाहीत. तसेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सुविधेसह निधी हस्तांतरण करु शकणार नाहीत.

आरबीआयने मार्च २०२२ मध्येही पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडणे थांबवण्यास सांगितले होते.

वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) शी संलग्न असलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकने आरबीआयच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी तत्काळ पावले उचलली असल्याचे म्हटले आहे. ओसीएल, पेमेंट कंपनी म्हणून विविध बँकांसोबत (केवळ पेटीएम पेमेंट बँक नव्हे) विविध पेमेंट उत्पादनांवर काम करते, असे पेटीएम कंपनीने गुरुवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ठेवी स्वीकारण्यापासून रोखण्याच्या आरबीआयच्या आदेशामुळे त्यांच्या वार्षिक कमाईवर ३०० कोटी ते ५०० कोटींचा “सर्वात वाईट परिणाम” होण्याची शक्यता असल्याचे पेटीएमने म्हटले आहे.

दरम्यान, RBI ने Paytm पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादल्यानंतर ब्रोकरेज फर्मनी त्याची टार्गेट प्राइस प्रति शेअर ५०० रुपयांपर्यंत कमी करण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button