'ईडी'च्‍या अटक कारवाईविरोधात हेमंत सोरेनांची सुप्रीम कोर्टात धाव, उद्या होणार सुनावणी | पुढारी

'ईडी'च्‍या अटक कारवाईविरोधात हेमंत सोरेनांची सुप्रीम कोर्टात धाव, उद्या होणार सुनावणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जमीन घोटाळा प्रकरणी हेमंत सोरेन यांना सक्‍तवसुली संचालनालयाच्‍या (‘ईडी’) अधिकार्‍यांनी बुधवारी अटक केली. तत्‍पूर्वी त्‍यांनी झारखंडच्‍या मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्‍यमंत्री होतील, अशी घोषणाही झाली. हेमंत सोरेन यांच्‍या अटकेच्‍या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी झारखंड बंदची हाक दिली आहे. तर ईडीच्‍या अटक कारवाईविरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली असून, यावर शुक्रवार,२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. ( Hemant Soren Approaches Supreme Court Against ED Arrest )

सोरेन यांची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍वीकारली : कपिल सिब्‍बल

ईडीच्‍या अटक कारवाईविरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली असून, यावर शुक्रवार,२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती सोरेन यांचे वकील कपिल सिब्‍बल यांनी दिली. ( Hemant Soren Approaches Supreme Court Against ED Arrest )

अटकेपूर्वी जारी केला व्‍हिडिओ

ईडीने अटक करण्यापूर्वी हेमंत साेरेन यांनी एक व्हिडिओ जारी केला. यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटलं आहे की, माझा संबंधित नसलेल्या प्रकरणी मला अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. बनावट कागदपत्रांच्‍या आधारे बनावट तक्रारीच्या आधारे मला अटक केली जात आहे. आज नाही तर उद्या सत्याचा विजय होईल. अलीकडेच बिहार राजकीय षडयंत्राचा बळी ठरला आहे, आता त्यांना झारखंडचा दुसरा बळी बनवायचा आहे, असा आरोपही त्‍यांनी आपल्‍या व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून केला होता.

झारखंड बंदची हाक

हेमंत सोरेन यांच्या अटक झाल्‍याच्‍या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी आज ( दि.१) झारखंड बंदची हाक दिली आहे. झारखंड बंदच्या आवाहनात १५ ते २० आदिवासी संघटनाही सहभागी होणार असल्याचे केंद्रीय सरना समितीचे अध्यक्ष अजय तिरके यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button