बेबनाव चव्हाट्यावर! नितीश कुमारांच्‍या नाराजीनंतर लालूप्रसादांच्‍या कन्‍येने डिलीट केली 'ती' पोस्‍ट | पुढारी

बेबनाव चव्हाट्यावर! नितीश कुमारांच्‍या नाराजीनंतर लालूप्रसादांच्‍या कन्‍येने डिलीट केली 'ती' पोस्‍ट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीतील संयुक्‍त जनता दल (जेडीयू) आणि राष्‍ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्‍यातील बेबनाव पुन्‍हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जाणून घेवूया महाआघाडीत बिघाडीची चर्चा का सुरु झाली आहे या विषयी…

नेमकं काय घडलं?

बिहारचे माजी मुख्‍यमंत्री आणि आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्‍या कन्‍या रोहिणी यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमारांवर हल्‍लाबोल केला. आज (दि.२५) झालेल्‍या राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा अप्रत्‍यक्षपणे आरजेडीला इशारा दिला. त्‍यानंतर काही मिनिटांमध्‍येच रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावरून नितीश कुमारांवर टीका करणारी पोस्‍ट डिलीट केल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. ( Lalu Yadav Daughter Rohini Acharya Delete Tweet Against Nitish)

काय म्‍हणाले होते नितीश कुमार?

बुधवारी, २४ जानेवारी रोजी कर्पुरी यांच्‍याजयंतीनिमित्त ‘जेडीयू’च्‍या वतीने पशुववैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्‍यात आले हाेते. या कार्यक्रमात बाेलताना नितीश कुमार म्हणाले की, “आम्ही जननायक कर्पुरी ठाकूर यांचे कार्य पुढे नेले आहे; पण आजकाल काही लोक केवळ आपल्‍या वारशालाच पुढे नेत आहेत. जननायक कर्पुरी ठाकूर  यांचे निधन झाले तेव्हा आम्ही त्यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांना पक्षात स्थान दिले. त्‍यांना मंत्री केले, खासदार केले. आजकाल बरेच लोक केवळ आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यात व्यस्त आहेत; पण जननायक कर्पुरी ठाकूर  यांनी कधीही आपल्या कुटुंबाला पुढे नेले नाही आणि त्यांच्याकडून धडा घेऊन आपण राजकारणात आपल्या कुटुंबाला कधीच पुढे नेले नाही”. यावेळी नितीश कुमार यांनी अप्रत्‍यक्षपणे लालूप्रसाद यादव यांच्‍या कुटुंबावरच निशाणा साधल्‍याचे मानले गेले.

“अनेकदा काही लोक…” रोहिणी यांची पोस्‍ट ठरली चर्चेचा विषय

लालूप्रसाद यादव यांच्‍या कन्‍या रोहिणी यादव यांनी आज (दि.२५) सकाळी साेशल मीडियाच्‍या माध्‍यमातून नितीश कुमारांवर निशाणा साधला. त्‍यांनी पहिल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले की, “अनेकदा काही लोक स्वतःच्या उणीवा पाहू शकत नाहीत; परंतु इतरांवर चिखलफेक करण्यासाठी गैरवर्तनाचा अवलंब करतात …”. रोहिणी यांनी काही वेळाने आणखी एक पाेस्‍ट लिहिली की, “तुम्ही तुमचा राग व्यक्त केला तर काय होईल, तुमची स्वतःची लायकी नसेल? जेव्हा स्वतःचे हेतू चुकत असतील तेव्हा कायद्याच्या नियमांकडे कोण दुर्लक्ष करू शकेल.” रोहिणी यांनी केलेल्‍या दाेन्‍ही पाेस्‍ट अप्रत्‍यक्षपणे नितीश कुमारांवर अप्रत्‍यक्ष हल्‍ला करणार्‍या हाेत्‍या. यावर नितीश कुमारांनी तीव्र नाराजी व्‍यक्‍त केल्‍यानंतर तत्‍काळ त्‍या हटविण्‍यात आल्‍याची चर्चा बिहारच्‍या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button