Karnataka Politics | कर्नाटकात कॉंग्रेसला धक्का! जगदीश शेट्टरांची भाजपमध्ये वापसी | पुढारी

Karnataka Politics | कर्नाटकात कॉंग्रेसला धक्का! जगदीश शेट्टरांची भाजपमध्ये वापसी

पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा आणि प्रदेश भाजप अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. जगदीश शेट्टर यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जगदीश शेट्टर यांनी यांना भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांची भाजपमध्ये वापसी झाली आहे. (Karnataka Politics) जगदीश शेट्टर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली.

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जगदीश शेट्टर यांनी भाजपचे आमदार म्हणून राजीनामा दिला होता. जवळपास तीन दशकांपासून ते भाजपशी जोडले गेले होते. पण तिकीट नाकारल्यानंतर ते भाजपची साथ सोडत काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यांना राज्यात मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसने नंतर त्यांना एक प्रमुख महामंडळ देण्याचे आश्वसन दिले होते.  पण सरकारी महामंडळे आणि मंडळांवर राजकीय नियुक्तींना विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेट्टर पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत.

‘म्हणून पुन्हा भाजपमध्ये…’

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जगदीश शेट्टर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “पक्षाने मला पूर्वी मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. काही कारणांमुळे मी काँग्रेसमध्ये गेलो. गेल्या ८-९ महिन्यांत खूप चर्चा झाल्या. भाजप कार्यकर्त्यांनीही मला भाजपमध्ये परत येण्यास सांगितले. येडियुराप्पा आणि विजयेंद्र यांचीही मी भाजपमध्ये परत यावे अशी इच्छा होती. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहे, या विश्वासाने मी पक्षात पुन्हा प्रवेश केला आहे.”

शेट्टर लिंगायत समाजातील प्रमुख नेते आहेत. कर्नाटकात २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत लिंगायत व्होटबँक असलेल्या ७० पैकी ३८ जागा जिंकून भाजपने दबदबा निर्माण केला होता.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी बुधवारी सांगितले की, भाजप लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रयत्न करत आहे. यातून भाजप-जेडीएस युतीकडे “नेतृत्वाची आणि आत्मविश्वासाची गंभीर उणीव” असल्याचे दिसते.

म्हैसूरमधील पेरियापटना येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना डी. के. शिवकुमार म्हणाले की, भाजपच्या अनेक नेत्यांनी शेट्टर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या वापसीसाठी मनधरणी केली. यातून भाजप आणि जेडीएसमधील नेतृत्व कमकुवत झाल्याचे दिसते, असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेट्टर पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याचा अफवा फेटाळून लावल्या होत्या. “शेट्टर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते भाजपमध्ये परतणार नाहीत.”

हे ही वाचा :

Back to top button