भाजप आणि मित्रपक्षांचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळासह करणार अयोध्यावारी | पुढारी

भाजप आणि मित्रपक्षांचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळासह करणार अयोध्यावारी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असलेले सर्व मुख्यमंत्री मंत्रिमंडळासह अयोध्यावारी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही मोठी रणनीती मानली जात आहे.

या वेळापत्रकात त्रिपुरा, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गोवा, आसाम, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला अयोध्येला येणार आहे. एकाच विमानातून संपूर्ण मंत्रिमंडळ प्रवास करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतील. सोबतच ते शरयू किनारी महाआरती करतील आणि हनुमानगढीचेही दर्शन घेणार आहेत.

कोणते मुख्यमंत्री कधी जाणार?

31 जानेवारी ः त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि मंत्री.
1 फेब्रुवारी ः उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि मंत्री.
5 फेब्रुवारी ः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्री.
6 फेब्रुवारी ः अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री व मंत्री.
9 फेब्रुवारी ः हरियाणाचे मुख्यमंत्री आणि मंत्री.
12 फेब्रुवारी ः राजस्थानचे मुख्यमंत्री आणि मंत्री.
15 फेब्रुवारी ः गोव्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री.
22 फेब्रुवारी ः आसामचे मुख्यमंत्री आणि मंत्री.
24 फेब्रुवारी ः गुजरातचे मुख्यमंत्री आणि मंत्री.
4 मार्च ः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्री.

‘पाच दशकांचे स्वप्न पूर्ण केले’

अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला. गेल्या पाच शतकांपासूनचे भारतीय संस्कृतीचे स्वप्न तुम्ही (मोदींनी) पूर्ण केले आहे. 22 जानेवारीला तुमच्या माध्यमातून झालेले कार्य इतिहासात अद्वितीय आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला.

Back to top button