पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजार हाँगकाँगला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनला आहे. भारतीय शेअर बाजार विकासाच्या शक्यता आणि धोरणात्मक सुधारणांमुळे गुंतवणुकदार स्नेही बनला आहे. ब्लूमबर्गने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, हाँगकाँगच्या ४.२९ ट्रिलियन डॉलर तुलनेत भारतीय शेअर बाजारातील सूचीबद्ध स्टॉकचे एकत्रित मूल्य सोमवारच्या बंदपर्यंत ४.३३ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. यामुळे भारत जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनला आहे. गेल्या ५ डिसेंबर रोजी त्याचे शेअर बाजार भांडवल प्रथमच ४ ट्रिलियन डॉलर पार झाले होते. त्यापैकी जवळपास निम्मे बाजार भांडवल गेल्या चार वर्षांत वाढले आहे. (India stock market)
मजबूत कॉर्पोरेट कमाई आणि वेगाने वाढत असलेला किरकोळ गुंतवणूकदार यामुळे भारतातील इक्विटी तेजीत आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत देशाने चीनला पर्याय म्हणून जगात स्वत:चे एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. भारतात मोठ्या प्रमाणात जागतिक गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. देशातील स्थिर सरकारमुळे आणि वापर आधारित अर्थव्यवस्थेमुळे मोठ्या राष्ट्रांमध्ये भारत सर्वात वेगाने विकसित होत आहे.
सध्या अमेरिका ५०.८६ ट्रिलियन डॉलरच्या बाजार भांडवलासह जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यानंतर चीनचे बाजार भांडवल ८.४४ ट्रिलियन डाॅलर आणि जपानचे ६.३६ ट्रिलियन डाॅलर आहे. त्यापाठाेपाठ भारत चौथ्या क्रमांकावर आहे.
हाँगकाँगचा हेंग सेंग निर्देशांकात सलग चौथ्या वर्षी घसरण झाली. तर शांघाय स्टॉक एक्स्चेंजने सलग दुसऱ्या वर्षी तोटा पाहिला. याउलट, भारतीय शेअर बाजाराने सलग आठ वर्षे वाढ नोंदवली.
हे ही वाचा :