पुढारी ऑनलाईन : २२ जानेवारी २०२४ चा सूर्य एक तेजस्वी प्रकाश घेऊन आला आहे. ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही, तर ती काळाच्या नवीन चक्राची उत्पत्ती आहे. आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाही. ते आता या दिव्य मंदिरात राहणार आहेत, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर बोलताना व्यक्त केला. (Ayodhya Ram Mandir Inauguration)
माझा ठाम विश्वास आणि अपार श्रद्धा आहे की, जे काही घडले आहे, त्याची अनुभूती देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील रामभक्तांना नक्कीच होत आहे. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत. शतकानुशतके अभूतपूर्व धैर्य, अगणित बलिदान, त्याग आणि तपश्चर्येनंतर आपल्या प्रभूरामांचे आगमन झाले आहे. या शुभप्रसंगी तुम्हा सर्वांना आणि तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. मी गर्भगृहात दैवी चैतन्याचा साक्षीदार बनूव तुमच्यासमोर उपस्थित आहे. सांगण्यासारखे बरेच काही आहे, पण कंठ दाटून येतो, मन भरून आले आहे. आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाही. आमचे रामलल्ला आता दिव्य मंदिरात राहणार आहेत. हा क्षण अलौकिक आहे. हा क्षण सर्वात पवित्र आहे. हे वातावरण, ह्या क्षणी आपल्या सर्वांवर प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आहे, असे पीएम मोदी म्हणाले.
आजचा हा प्रसंग केवळ उत्सवाचा क्षण नाही तर त्याचबरोबर भारतीय समाजाच्या परिपक्वतेची जाणीव करून देणाराही क्षण आहे. आमच्यासाठी हा केवळ विजयाचा नाही तर नम्रतेचाही क्षण आहे. रामलल्लांच्या मंदिराची उभारणी भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहे. हे मंदिर कोणत्याही आगीला नाही तर उर्जेला जन्म देत आहे. राम अग्नी नाही, राम ऊर्जा आहेत. राम वाद नाही, राम समाधान आहे. राम फक्त आमचे नाहीत, राम सर्वांचे आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
भारताच्या संविधानाच्या पहिल्या प्रतीमध्ये भगवान राम आहेत. संविधान अस्तित्वात आल्यानंतरही भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावरून अनेक दशके कायदेशीर लढाई सुरूच होती. न्यायाची प्रतिष्ठा जपणाऱ्या भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो, असे पीएम मोदींनी नमूद केले. (Ayodhya Ram Mandir Inauguration)
आज प्रत्येक गावात एकाच वेळी कीर्तन होत आहे. आज मंदिरांमध्ये उत्सव होत आहेत, स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. संपूर्ण देश आज दिवाळी साजरी करत आहे. प्रभू राम भारताच्या आत्म्याच्या प्रत्येक कणाशी जोडलेले आहेत. राम भारतीयांच्या अंतर्मनात वास करतात. गुलामगिरीची मानसिकता झुगारून उभे राहणारे राष्ट्र, भूतकाळाच्या प्रत्येक दंशातून हिंमत घेणारे राष्ट्र अशा प्रकारे नवा इतिहास घडवते. आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या तारखेबद्दल, या क्षणाबद्दल चर्चा करतील, असेही ते म्हणाले.
अयोध्येत आज सोमवारी (दि.२२) 'न भूतो न भविष्यती' असा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी अभिजित मुहूर्तावर अयोध्येत श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला अन् भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान झाले. डोळ्यावरून पट्टी काढण्यात आल्यानंतर श्री रामलल्लांचे मूखदर्शन सर्वांना घडले. यावेळी पीएम मोदींनी रामलल्लांसमोर साष्टांग दंडवत घातला. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरातील 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ दिवसांचा उपवास सोडला. (Ayodhya Ram Mandir Inauguration)
पीएम मोदी पुढे म्हणाले की, हे रामाच्या रूपातील राष्ट्रीय चैतन्याचे मंदिर आहे. राम आधार आहे. राम ही भारताचा विचार आहे. राम प्रवाह आहे. राम नीतीही आहे. राम सर्वव्यापी आहे. राम चैतन्य आहे. राम चिंतन आहे. राम वर्तमान आहे. राम अनादी अनंत आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अन्य उपस्थित होते.
यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात जय रामल्ला भगवान की जय, भारत माता की जय आणि जय जय सीताराम म्हणत केली. ते म्हणाले की मन भावूक आहे. भावनेने भारावून गेलेले आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. प्राणप्रतिष्ठेबद्दल सर्वांचे अभिनंदन.
योगी पुढे म्हणाले की, भारताचा प्रत्येक मार्ग रामजन्मभूमीकडे येत आहे. जिथे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता तिथेच मंदिर उभारले आहे. बहुसंख्यांक समाजाने यासाठी दीर्घ काळ लढा दिला. "भगवान रामलल्ला भव्य, दिव्य आणि नव्या निवासस्थानात विराजमान झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे कोटी- कोटी मनःपूर्वक अभिनंदन. मन भावूक आहे. नक्कीच तुम्हा सर्वांना असेच वाटत असेल. आज या ऐतिहासिक प्रसंगी, भारत प्रत्येक शहर, प्रत्येक गाव अयोध्यावासी आहे. प्रत्येक मनात रामनाम आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदअश्रू आहेत.
अयोध्येत त्रेतायूग अवतरले आहे. प्रभूरामांच्या कृपेने अयोध्येच्या रस्त्यावर आता गोळ्यांचा आवाज येणार नाही. कर्फ्यू असणार नाही. येथे दीपोत्सव होणार आहे, असेही योगी म्हणाले. भाषणाच्या शेवटी त्यांनी जयजय सियाराम असा नारा दिला. (Ayodhya Ram Mandir Inauguration)
हे ही वाचा :