Stock Market Updates | खरेदीदार परतले! सेन्सेक्स ६०० अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांनी १० मिनिटांत कमावले ३ लाख कोटी | पुढारी

Stock Market Updates | खरेदीदार परतले! सेन्सेक्स ६०० अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांनी १० मिनिटांत कमावले ३ लाख कोटी

पुढारी ऑनलाईन : तीन दिवसांच्या घसरणीनंतर जागतिक सकारात्मक संकेतांच्या जोरावर भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी तेजी परतली. सेन्सेक्स आणि निफ्टी आज उच्च पातळीवर खुले झाले. सर्वच क्षेत्रांत खरेदी दिसून येत आहे. बाजारातील तेजीत बँकिंग, एनर्जी आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर आहेत. आज सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी वाढून ७१,८७६ पर्यंत पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक २१,६५० जवळ गेला. (Stock Market Updates)

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, बाजारातील सुरुवातीच्या या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.९६ लाख कोटींनी वाढून ३७२.४५ लाख कोटींवर पोहोचले.

संबंधित बातम्या

सेन्सेक्सवर टायटन, टेक महिंद्रा, ॲक्सिस बँक, भारती एअरटेल, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, टीसीएस, बजाज फायनान्स, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो हे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत. तर इंडसइंड बँकेचा शेअर्स २ टक्क्यांनी घसरला.

एनएसईवर भारती एअरटेल, ओएनजीसी, ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा, टीसीएस हे टॉप गेनर्स आहेत. तर इंडसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प हे घसरले आहेत.

एचसीएल टेक आणि टेक महिंद्राच्या शेअर्समधील तेजीमुळे निफ्टी आयटी निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात १ टक्क्याने वाढला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि श्रीराम फायनान्स यांच्या नेतृत्वाखाली निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसही १ टक्के वाढला. दरम्यान, निफ्टी ऑटो, एफएमसीजी, मेटल, फार्मा आणि रियल्टीही तेजीत आहेत. (Stock Market Updates)

जागतिक बाजार

अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक काल वाढून बंद झाले होते. आज आशियाई बाजारातही तेजीचे वातावरण आहे. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा विस्तृत निर्देशांक ०.९ टक्क्यांनी वाढला. जपानचा निक्केई १.४१ टक्क्यांनी, तर कोरियाचा कोस्पी जवळपास १ टक्क्यांनी वाढला. दरम्यान, हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.४ टक्क्यांनी घसरला.

Back to top button