Ayodhya Ram Mandir Inauguration : बालकाण्ड भाग 4 : अहल्या उद्धार

Ayodhya Ram Mandir Inauguration : बालकाण्ड भाग 4 : अहल्या उद्धार
Published on
Updated on

संकलन : सुरेश पवार

महर्षी विश्वामित्र यांच्या यज्ञात विघ्न आणणार्‍या सुबाहु आणि मारीचसह दुष्ट राक्षसांचा श्रीरामाने वध केला. त्यामुळे राजर्षी विश्वामित्र आणि सिद्धाश्रमातील मुनीजन प्रसन्न झाले. आता आपला पुढील आदेश काय, अशी पृच्छा श्रीरामाने विनम्र्रपणे महर्षी विश्वामित्रांना केली, तेव्हा मिथिलाधिपती राजा जनक याने आपल्या कन्येचे स्वयंवर योजिले आहे. या जनक राजाकडे महान आणि अद्भुत असे शिवधनुष्य आहे. त्यानिमित्त आम्ही आता मिथिलानगरीत जात आहोत. तूही बंधूसह वर्तमान आमच्या समवेत चल, असे ब्रह्मर्षी विश्वामित्र यांनी सांगितले. त्यांच्या वचनानुसार राम-लक्ष्मण यांनी त्यांच्याबरोबर सिद्धाश्रमातून उत्तर दिशेला प्रयाण केले. शोण नदीच्या तीरी त्यांनी विश्रांती घेतली. यावेळी महर्षी विश्वामित्रांनी पृथ्वीवर गंगा नदी आणणार्‍या भगिरथासह अनेक कथा सांगितल्या आणि श्रीराम, लक्ष्मणांनी त्या तन्मयतेने श्रवण केल्या. (Ayodhya Ram Mandir Inauguration)

तद्नंतर प्रवास करीत महर्षी विश्वामित्रांसह राम-लक्ष्मण आणि मुनिगण यांचे मिथिला नगरीजवळ असलेल्या विशाला या वैभवशाली नगरीत आगमन झाले. तेव्हा त्या प्रदेशाचा राजा सुमती याने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. विश्वामित्रांबरोबर असलेल्या राम-लक्ष्मणाला पाहून त्याने त्यांची चौकशी केली. श्रीरामाच्या पराक्रमाची माहिती मिळताच त्याला पराकाष्ठेचा विस्मय वाटला आणि त्या दशरथपुत्रांचा त्याने यथाविधी आदर सत्कार केला. (Ayodhya Ram Mandir Inauguration)

विशाला नगरीतील वास्तव्यानंतर राजर्षी विश्वामित्र, राम-लक्ष्मण, मुनिजन यांनी मिथिलानगरीकडे प्रयाण केले. या नगरीजवळ असलेल्या वनात एक जुनाट आश्रम दृष्टीस पडताच, रामाने हा आश्रम कोणाचा, अशी महर्षींना विचारणा केली. तेव्हा त्या महातपस्वीने आश्रमाचा सारा इतिहास कथन केला. ते म्हणाले, "महात्मा गौतम ऋषी यांचा हा आश्रम. अहल्या ही त्यांची पत्नी. ती अत्यंत सौंदर्यवती होती. तिच्या रूपाची कीर्ती त्रिखंडात पसरली होती. देवाधिदेव इंद्रालाही तिचा मोह पडला. एकदा गौतम मुनी आश्रमात नव्हते. ही संधी साधून इंद्र गौतम आश्रमात आला. त्याने गौतम मुनींचा वेश धारण केला होता. अहल्याजवळ त्याने आपली कामेच्छा प्रकट केली.

गौतम ऋषींच्या कपट वेशात आलेला हा इंद्र आहे, हे अहल्येने जाणले. तथापि, आपल्या सौंदर्यावर प्रत्यक्ष इंद्र मोहित झाला, या कल्पनेने तिला अभिमान वाटला आणि ती त्याच्याशी रममाण झाली. रतिसुखानंतर अहल्येने इंद्राला तातडीने निघून जायला सांगितले आणि गौतम ऋषींच्या कोपापासून आपले रक्षण करण्याची विनंतीही केली. अहल्येला आश्वासन देऊन घाईघाईने आश्रमातून बाहेर पडणारा इंद्र, त्याचवेळी आलेल्या गौतम ऋषींच्या नजरेस पडला. आपला वेश धारण करून आलेल्या इंद्राने काय कृत्य केले, हे त्या महातपस्वीने तत्काळ जाणले आणि त्यांनी इंद्राला तुझ्या अंगावर सहस्र भगे (म्हणजे छिद्रे) पडतील, असा शाप दिला. तत्काळ इंद्र सहस्राक्ष झाला. (त्याच्या शरीराला तेवढी छिद्रे पडली).

दुर्वर्तन केलेल्या अहल्येलाही त्या महातेजस्वी मुनीने शापिले. तू हजारो वर्षे याच आश्रमात कोणाच्याही दृष्टीस न येता खितपत पडशील, अशी शापवाणी त्यांनी उच्चारली. दशरथपुत्र श्रीराम येथे येईल, त्याच्या दर्शनाने तुला पूर्वरूप प्राप्त होईल, असा उःशापही त्यांनी दिला."

विश्वामित्रांनी ही कथा सांगितली. श्रीरामाला ते म्हणाले, "हे महाप्रतापी रामा, या आश्रमात चल. तेथे जाऊन अहल्येचा उद्धार कर." त्याप्रमाणे ब्रह्मर्षी विश्वामित्रांबरोबर राम-लक्ष्मण, मुनीजन यांनी गौतम आश्रमात प्रवेश केला. श्रीरामाचे आगमन होताच आणि त्याचे दर्शन होताच अहल्या शापमुक्त झाली. तेव्हा स्वर्गातून देव-देवतांनी, अप्सरांनी पुष्पवृष्टी केली आणि आणि 'साधू, साधू' अशा गौरवपर वचनांनी आकाश दुमदुमले. अहल्येने आदरपूर्वक श्रीरामाचे पाद्य, अर्घ्य देऊन आतिथ्य केले. अहल्या शापमुक्त होताच महातपस्वी गौतम ऋषींचेही आश्रमात आगमन झाले. त्यांनीही मोठ्या आनंदाने रामाचे अभीष्टचिंतन केले. सत्कार केला. अहल्येच्या उद्धाराने श्रीरामाची कीर्ती सर्वदूर पसरली.

॥ जय श्रीराम ॥

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news