𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭 𝐉𝐨𝐝𝐨 𝐍𝐲𝐚𝐲 𝐘𝐚𝐭𝐫𝐚 : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून प्रारंभ | पुढारी

𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭 𝐉𝐨𝐝𝐨 𝐍𝐲𝐚𝐲 𝐘𝐚𝐭𝐫𝐚 : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून प्रारंभ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून ( दि. १४ ) प्रारंभ झाला. राहुल गांधी दिल्लीहून मणिपूरला पोहोचले. राजधानी इंफाळ येथून यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ध्वजारोहण केले. जनसंपर्काच्या उद्देशाने सुरू झालेल्या या प्रवासात राहुल गांधींशिवाय इतर अनेक ज्येष्ठ नेतेही सहभागी होत आहेत. मणिपूरमधून प्रारंभ झालेल्‍या  ‘भारत न्याय यात्रे’ची सांगता मुंबईत  होणार आहे, (𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭 𝐉𝐨𝐝𝐨 𝐍𝐲𝐚𝐲 𝐘𝐚𝐭𝐫𝐚)

राहूल गांधींचा भाजपवर हल्लाबाेल

‘भारत न्याय यात्रे’च्‍या शुभारंभ प्रसंगी राहुल गांधी म्‍हणाले की, “यात्रा कुठून सुरु करायची असा विचार सुरु होता. त्यावेळी सर्वप्रथम मणिपूरचे नाव समोर आले. आज देशात भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक देशातील राजकारणात द्वेषाचे बीज पेरत आहे. मणिपूरमध्येही हेच केले आहे. भाजपसाठी मणिपूर महत्त्वाचे नाही. हे स्पष्ट झाले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला अद्याप भेट दिलेली नाही.”

या वेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी मतांसाठी केवळ मणिपूरला येतात; पण जेव्हा येथील नागरिक संकटात असतात तेव्हा ते तोंडही दाखवत नाही. भाजप धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत आहेत.”

𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭 𝐉𝐨𝐝𝐨 𝐍𝐲𝐚𝐲 𝐘𝐚𝐭𝐫𝐚 : १४ राज्‍ये, ८५ जिल्‍हे अन ६,२०० किमीचा प्रवास…

राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेत 14 राज्यांमधील तब्बल 85 जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. हा मोर्चा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात 6,200 किलोमीटरचा प्रवास करेल. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे १४ जानेवारी रोजी मणिपूरमधून या यात्रेचा शुभारंभ करतील, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या आणि उत्तरेकडील काश्मीरमध्ये संपलेल्या भारत जोडो यात्रेला “ऐतिहासिक यात्रा” होती, असेही त्‍यांनी यावेळी नमूद केले. आता, राहुल गांधी पहिल्या भारत जोडो यात्रेचा अनुभव घेऊन एक यात्रा करत आहेत. ही यात्रा तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी संवाद साधणारी असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

 १४५ दिवसांत ४०८० किमी

राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा यात्रा ७ सप्टेंबर रोजी देशाच्या दक्षिणेतून सुरु झाली होती. सुमारे १४५ (११६ दिवस चालणे) दिवसांत ४,०८० किमी, ७५ जिल्हे, १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा प्रवास केल्यानंतर ३० जानेवारी रोजी श्रीनगर येथे या यात्रेचा समारोप झाला. ही पदयात्रा  तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब राज्यातून गेली. दरम्यान भारत न्याय यात्रेची घोषणा 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आली आहे, ज्यामध्ये काँग्रेस आणि त्याचे भारतीय गटाचे सदस्य भाजपचा पाडाव करण्याच्या प्रयत्नात आहेत.

हेही वाचा 

Back to top button