जिंजिवायटिस : हिरड्यांचे आरोग्य | पुढारी

जिंजिवायटिस : हिरड्यांचे आरोग्य

डॉ. निखिल देशमुख

पायरिया हा एक सर्वसामान्य आजार असून जगभरात सर्वच ठिकाणी तो आढळून येतो. ज्या व्यक्‍ती आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक असतात, त्याच या आजारापासून दूर राहू शकतात. अन्यथा 75 टक्के लोक कधी ना कधी तरी जिंजिवायटिस अर्थात हिरड्यांना सूज येणे या आजारामुळे त्रस्त होतात. ज्यावेळी दातांच्या आणि हिरड्यांच्या स्वच्छतेकडे, आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही तेव्हाच पायरियाचा रोग उद्भवतो. दात आणि हिरड्यांच्यामध्ये अन्‍नाचे कण, लाळ आणि बॅक्टेरिया जमा होतात. याला दंतचिकित्सक ‘प्लाक’ असे म्हणतात. ब्रश केल्यानंतर चार ते बारा तासांमध्ये प्लाक बनणे सुरू होते. हे रोखण्यासाठी आवश्यक ते उपाय केले नाहीत तर ते कडक होऊन दातांवर पिवळट थर जमा करतात. यामुळे हिरड्यांना सूज येते. हिरड्या सूजल्यामुळे त्यांचा रंग गडद होतो. यामुळे हिरड्यांमध्ये जळजळ होऊ लागते. कधी-कधी त्यातून रक्‍तही येते. या परिस्थितीतही उपचार केले नाहीत तर हिरड्यांच्या खाली हाडे आणि इतर पेशींनादेखील सूज येते आणि त्या सडू लागतात. याला पेरिओडोन्टायटिस असे म्हणतात.

या स्थितीत गेल्यानंतर हिरड्यांची ( जिंजिवायटिस )दातांवरची पकड ढिली होऊ लागते आणि दात हिरड्यांपासून मोकळे होऊ लागतात. खालच्या जबड्याचे हाड सडू लागते आणि त्यात पू बनने सुरू होते. दात हलायला लागून ते पडू लागतात. या सर्व त्रासापासून दूर राहण्यासाठी आपल्याला दातांची आणि हिरड्यांची चांगल्या प्रकारे देखभाल केली पाहिजे. जेणे करून शेवटपर्यंत हे दात आपल्यासोबत राहतील. यासाठीच काही आवश्यक उपाय आहेत ज्यांचे पालन करणे प्रत्येकासीठीच आवश्यक आहेत. अशाच काही उपायांबद्दल आपण जाणून घेऊ.

दात आणि हिरड्यांसाठी ( जिंजिवायटिस ) सकाळी आणि संध्याकाळी थोडा वेळ नक्‍की द्यायला हवा. ब्रश करण्याची पद्धत चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे. केवळ एक दैनंदिन क्रिया म्हणून त्याकडे बघू नेय. सकाळी उठल्यानंतर किंवा न्याहरीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे वेळ काढून योग्य प्रकारे ब्रश करावा. याला आपल्या दिनचर्येत सामील करून घ्यावे. काहीही झाले तरी ब्रश केल्याशिवाय अंथरुणात झोपण्यासाठी जाऊ नये.

दात घासताना ब्रश हिरड्या ( जिंजिवायटिस ) आणि दातांच्या वर 45 अंशाच्या कोनात हळूहळू फिरवावा. पहिले गोल गोल, नंतर वरून खाली आणि शेवटी खालून वर अशा पद्धतीने तो फिरवावा. ब्रश गोलाकार फिरवल्यामुळे हिरड्यांना मालिश होते आणि वर खाली केल्यामुळे दातात अडकलेले अन्‍नकण बाहेर निघून दातांची स्वच्छता होते. ब्रश करताना दातांच्या बाहेरच्या पृष्ठभागासोबतच आतील पृष्ठभागाची स्वच्छता केली पाहिजे. ब्रश नेहमी मऊ दात असलेलाच वापरावा. कारण असा ब्रश दात आणि हिरड्यांसाठी चांगला असतो. काहीशा कडक दातांचा ब्रश जास्त दिवस चालत असला तरी यामुळे दातांचे इनॅमल लवकर घासले जाते. त्यामुळे असा ब्रश दातांसाठी चांगला नसतो. प्रत्येक तीन महिन्यांनंतर ब्रश बदलावा. म्हणजे ब्रश मुलायम राहील. मुलायम ब्रश हिरड्या आणि दातांसाठी चांगले असतात. तसेच वेळोवेळी चूळ भरण्याची सवयदेखील दात आणि हिरड्यांच्या ओरोग्यासाठी खूप लाभदायक असते.

हिरड्या आणि दातांवर घाण साचली तर त्वरित दंतवैद्यांकडून त्याची स्वच्छता करून घ्यावी. यासाठी आजकाल बरीच तंत्रे विकसित झालेली आहेत. साधारण स्केलिंग, अल्ट्रासाऊंड स्केलिंग यांसारख्या तंत्रांचा वापर करावा. यामुळे साचलेला मळ जातो आणि दात व हिरड्या यांची मजबुती वाढते. बरेचदा या उपचारांमुळे दात कमकुवत होतात, असे अनेक जण विचार करतात. मात्र, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. यामुळे उलट दात आणि हिरड्यांचे आयुष्य वाढते. टॅनिक अ‍ॅसिडयुक्‍त गम पेंटने मालिश केल्याने हिरड्या मजबूत होतात. हा उपचार पायरियाच्या प्रारंभिक टप्प्यावर लाभदायक ठरतो. हिरड्यांची चांगल्या प्रकारे देखभाल करूनही वारंवार सूज येत असेल तर रक्‍तातील साखर तपासून घ्यावी. कारण रक्‍तातील साखर वाढल्यानंतर देखील हा त्रास होऊ शकतो.

Back to top button