AIIMS Hospital : दिल्लीतील एम्स रुग्णालयात आग, कोणतीही जीवितहानी नाही | पुढारी

AIIMS Hospital : दिल्लीतील एम्स रुग्णालयात आग, कोणतीही जीवितहानी नाही

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमधील (एम्स) एका भागाला गुरुवारी पहाटे आग लागली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र संबंधित भागाचे नुकसान झाले. या आगीचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही. एम्समध्ये दुसऱ्या माळ्यावर असलेल्या टीचिंग विभागातील संचालकांच्या कार्यालयात ही आग लागली होती. आगीत फाईल्स, कार्यालयातील कागदपत्रे, फ्रिज आणि कार्यालयातील फर्निचर जळून खाक झाले. (AIIMS Hospital)

एम्स प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ५.२५ वाजता दुसऱ्या माळ्यावरील एका रूममध्ये आग लागली. सुरक्षा आणि आग नियंत्रण विभागाने तातडीने अग्निशमन विभागाला कळवले. दिल्ली अग्निशमन विभागालाही याबाबत तात्काळ कळविण्यात आले. एम्समध्ये असलेल्या अग्निशमन यंत्रणेद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. दिल्ली अग्निशमन विभागाच्या गाड्याही या ठिकाणी पोहोचल्या होत्या. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

एम्समध्ये याआधीही अशा प्रकारच्या काही घटना घडल्या आहेत. २०१९ मध्ये सर्वात मोठी आगीची दुर्घटना नोंदवली गेली. त्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये जुन्या बाह्यरुगण विभागाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती, तिथे टीचिंग विभाग आणि एंडोस्कोपी रूम आहे. २०२३ मध्ये एम्स प्रशासनाने आपल्या सर्व विभागांना आगीपासुन सुरक्षेचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. आणि सर्व विभागांमध्ये यासंबंधी दैनंदिन तपासणी अनिवार्य केली होती.

संबंधित बातम्या

हेही वाचा 

Back to top button