तेलंगणा सरकार : कृषी कायद्यांविरोधात लढताना प्राण गमावलेल्या ७५० शेतकऱ्यांना ३ लाखांची मदत | पुढारी

तेलंगणा सरकार : कृषी कायद्यांविरोधात लढताना प्राण गमावलेल्या ७५० शेतकऱ्यांना ३ लाखांची मदत

हैदराबाद; पुढारी ऑनलाईन

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाला 3 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल, अशी घोषणा केली आहे.

अशा सर्व पीडित कुटुंबांना कोणत्याही अटीशिवाय प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्याची विनंतीही त्यांनी केंद्र सरकारला केली आहे. चंद्रशेखर राव यांचा मुलगा केटीआर याने ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे.

ते म्हणाले की, तेलंगणा सरकारने कृषी कायद्यांविरोधात लढताना प्राण गमावलेल्या ७५० हून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकारमधील मंत्री केटीआर यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारनेही कोणत्याही अटीशिवाय सर्व शेतकऱ्यांवर दाखल केलेले खटले मागे घ्यावेत.

यापूर्वी भाजप खासदार वरुण गांधी यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पंजाब सरकारने पीडित शेतकरी कुटुंबांसाठी यापूर्वीच अनेक प्रकारची मदत जाहीर केली आहे. केसीआर यांच्या घोषणेनंतर या मागणीला आणखी जोर मिळू शकतो.

अशा कुटुंबांना मदत करण्याची मागणीही शेतकरी नेते करत आहेत. पंजाब आणि यूपीमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईचा मुद्दा तापू शकतो. संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वीच शेतकऱ्यांवरील सर्व खटले मागे घेण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button