Maharishi Valmiki Airport Ayodhya Dham | PM मोदींच्या हस्ते अयोध्येत विमानतळाचे उद्घाटन | पुढारी

Maharishi Valmiki Airport Ayodhya Dham | PM मोदींच्या हस्ते अयोध्येत विमानतळाचे उद्घाटन

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येत २२ जानेवारीच्या रामल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असणारच आहेत. पण त्याआधी आज (दि.३०) त्यांनी अयोध्यावासीयांना विविध विकासकामांच्या उद्घाटनांची भेट दिली. अयोध्याधाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन केले. (Maharishi Valmiki Airport Ayodhya Dham)

भारतीय मंदिर वास्तुकलेसारखी रचना असलेल्या अयोध्या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील टर्मिनल भवनचे उद्घाटन आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. या विमानतळावर अहमदाबाद ते अयोध्या आणि दिल्ली ते अयोध्या या इंडिगोच्या विमानसेवेला प्रारंभ होणार आहे. (Maharishi Valmiki Airport Ayodhya Dham)

अवघ्या २० महिन्यांत उभारले विमानतळ

राममंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन होत असलेल्या विमानतळाचे बांधकाम अवघ्या २० महिन्यांच्या विक्रम वेळेत पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) चे अध्यक्ष संजीव कुमार यांनी दिली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उत्तर प्रदेश सरकारसोबत झालेल्या करारानुसार भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अयोध्या विमानतळाच्या विकासाचे काम हाती घेतले होते. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या विमानतळासाठी ८२१ एकर जमीन उपलब्ध करून दिली, असे सरकारने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (PM Modi to Inaugurate Ayodhya Airport)

संजीव कुमार यांनी पुढे म्हटले की अयोध्येसाठी एअर कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे आणि विमानतळ प्राधिकरण विमानतळ विस्ताराबद्दल समाधानी आहे. अयोध्येत विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे आणि विमानतळ प्राधिकरणाने २० महिन्यांच्या विक्रमी वेळेत ते पूर्ण केले आहे, असे संजीव कुमार यांनी अयोध्येत ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. “अयोध्येसाठी एअर कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. येथे प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर अयोध्येतील कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल. मला विश्वास आहे की अयोध्येतील लोकही यामुळे खुश असतील.”

२,२०० मीटर लांब विमानतळाची धावपट्टी

श्रीराम मंदिरासह राम की पैडी, हनुमान गढी, नागेश्वर नाथ मंदिर, बिर्ला मंदिर आदी प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांना या विमानतळामुळे हवाई प्रवासाचा लाभ मिळणार आहे. सरकारच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, विमानतळाची धावपट्टी २,२०० मीटर लांब आहे आणि ते A-321 प्रकारच्या विमानांच्या ऑपरेशनसाठी ती योग्य असेल. ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट (GSE) क्षेत्रासह आठ A321 प्रकारच्या विमानांच्या पार्किंगसाठी दोन लिंक टॅक्सीवेज आणि एक ऍप्रनदेखील उभारले आहेत.

दुसऱ्या टप्प्यात ५० हजार चौ.मी.च्या नवीन टर्मिनल इमारतीच्या विकासाची योजना आहे, जी गर्दीच्या वेळी ४ हजार प्रवाशांना आणि वार्षिक ६० लाख प्रवाशांच्या सोयीची असेल. सध्याच्या २,२०० मीटर ते ३,७५० मीटरपर्यंतचा धावपट्टीचा विस्तार कोड E (B-777) प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी योग्य असेल. येथे समांतर टॅक्सी ट्रॅक आणि अतिरिक्त १८ विमान पार्किंग स्टँडसाठी ऍप्रन असेल.

महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम नावाने नव्याने बांधलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्यास्ते आज १२ वाजता झाले. या विमानतळाच्या उभारणीसाठी ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. ज्यामध्ये टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर, फायर स्टेशन, कार पार्किंग आणि अलाईड सिटी-साइड पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

६,५०० चौ.मी.च्या परिसरात बांधलेली टर्मिनल इमारत पीक अवर्समध्ये ६०० प्रवाशांना आणि वार्षिक १० लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सुसज्ज आहे. अयोध्येचा इतिहास आणि महत्त्व लक्षात घेऊन या विमानतळाची रचना करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button