Sukanya Samridhi Yojana | मोदी सरकारची नवीन वर्षाची भेट, सुकन्या समृद्धीसह छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवीन दर | पुढारी

Sukanya Samridhi Yojana | मोदी सरकारची नवीन वर्षाची भेट, सुकन्या समृद्धीसह छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

पुढारी ऑनलाईन : केंद्रातील मोदी सरकारने लोकांना नवीन वर्षाच्या आधी मोठी भेट दिली आहे. सरकारने जानेवारी-मार्च २०२४ तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samridhi Yojana) आणि ३ वर्षाच्या मुदत ठेवी सारख्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी ही घोषणा केली आहे.

मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजने (Sukanya Samridhi Yojana) वरील व्याजदरात जानेवारी-मार्च तिमाहीसाठी २० बेसिस पॉइंटनी वाढ केली ​​आहे. अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ठेवींना सध्याच्या ८ टक्क्यांवरून ८.२ टक्के व्याजदर आकारला जाईल. सरकार दर तिमाहीत पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्‍या छोट्या बचत योजनांवरील व्याजदर अधिसूचित करते.

केंद्र सरकारने आता सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८.२ टक्के केला आहे. तर ३ वर्षांच्या मुदत ठेवीचा व्याजदर ७.१ टक्के केला आहे. तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड – पीपीएफ) मध्ये गेल्या तीन वर्षात कोणताही बदल केलेला नाही. पीपीएफच्या व्याजदरात एप्रिल-जून २०२० मध्ये बदल केला होता. जेव्हा तो ७.९ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला होता.

मागील घोषणेवेळी, केंद्राने पाच वर्षांच्या आवर्ती ठेव दरांमध्ये (आरडी) किरकोळ वाढ वगळता ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता.

आता नवीन घोषणेपूर्वी, छोट्या बचत योजनांवरील व्याजदर ४ टक्के (पोस्ट ऑफिस बचत ठेवी) आणि ८.२ टक्के (ज्येष्ठ नागरिक बचत योजना) दरम्यान होते.

जानेवारी- मार्च २०२४ चे व्याजदर

सुकन्या समृद्धी खाते : ८.२ टक्के
ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ८.२ टक्के
मासिक उत्पन्न खाते : ७.४ टक्के.

हे ही वाचा :

 

Back to top button