Congress On Ram Mandir inauguration: राममंदिर उद्घाटनात सोनिया गांधी यांच्या सहभागावर कॉंग्रेसचे मौन | पुढारी

Congress On Ram Mandir inauguration: राममंदिर उद्घाटनात सोनिया गांधी यांच्या सहभागावर कॉंग्रेसचे मौन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: अयोध्येत सोमवारी २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी कॉंग्रेस अधयक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना निमंत्रण आले आहे. मात्र, त्यांच्या सहभागाबद्दल काँग्रेसने मौन पाळले आहे. “योग्यवेळी आणि नेत्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांच्या आधारे निर्णय होईल. लगेच त्यावर भाष्य करण्याची गरज नाही”, असे माध्यम विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज (दि.२९) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Congress On Ram Mandir inauguration)

राममंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सर्व राजकीय पक्षांना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यात सहभागी होणार नसल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. तर, या कार्यक्रमाला कॉंग्रेसचा प्रतिनिधी उपस्थित राहू शकतो, असे दिग्विजयसिंह यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेतृत्वाच्या सहभागाबद्दल वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. (Congress On Ram Mandir inauguration)

सहभागाबद्दल अद्याप काहीही निर्णय नाही

कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी यांना राममंदिर उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण आले असल्याच्या माहितीला माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज दुजोरा दिला. पत्रकारांशी बोलताना जयराम रमेश यांनी सांगितले, की पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना २२ तारखेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. परंतु, सहभागाबद्दल अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. दोन्ही नेत्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ठरविण्यात येईल आजच त्यावर निर्णय सांगण्याची गरज नाही. ज्या नेत्यांना निमंत्रण मिळालेले नाही तेच यावर बोलत आहेत, असा टोलाही जयराम रमेश यांनी लगावला.

सॅम पित्रोदा यांचे म्हणणे कॉंग्रेसपक्षाची अधिकृत भूमिका नाही- जयराम रमेश

दरम्यान, राममंदिरावर कॉंग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानापासूनही कॉंग्रेसने अंतर राखले आहे. बेरोजगारीसारख्या संवेदनशील मुद्द्यांऐवजी राममंदिरावर लक्ष केंद्रीत होणे त्रासदायक असल्याचे सॅम पित्रोदा यानी म्हटले होते. यावर जयराम रमेश यांनी स्पष्ट केले की सॅम पित्रोदा यांचे म्हणणे ही कॉंग्रेसपक्षाची अधिकृत भूमिका नाही. पित्रोदा यांचे बोलणे व्यक्तिगत स्वरुपाचे आहे. कॉंग्रेसचे जे कोणी नेते बोलत आहेत ते पक्षातर्फे बोलत नसून त्यांचा दृष्टिकोन व्यक्तिगत स्वरूपाचा आहे, अशी पुस्तीही जयराम रमेश यांनी जोडली. सॅम पित्रोदा यांच्या विधानावर सत्ताधारी भाजपकडून तिखट प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर आज कॉंग्रेसकडून यावर सारवासारव करण्यात आली. (Congress On Ram Mandir inauguration)

हेही वाचा:

Back to top button