Congress vs Sanjay Raut : महाविकास आघाडीत फुटले फटाके! जागावाटपावरून काँग्रेस-ठाकरे गटात जुंपली

Congress vs Sanjay Raut : महाविकास आघाडीत फुटले फटाके! जागावाटपावरून काँग्रेस-ठाकरे गटात जुंपली

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कोणतेही जागावाटप हे महाराष्ट्राच्या स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतल्या शिवाय पुढे जाऊ शकत नाही. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी या मताशी सहमत आहे, असे म्हणत काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जागा वाटपावरील विधानाला प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याचे समोर आले आहे.

मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियाद्वारे संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या मतानुसार ४० आमदार सोडून गेल्यानंतर त्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस पक्षाने शून्य जागेपासून सुरुवात करुन चर्चा करायला हवी. आमचा पक्ष महाराष्ट्र विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष असून त्याचे नेतृत्व करत आहे. मी श्री संजय राऊत यांना सांगू इच्छितो की, कोणतेही जागावाटप हे महाराष्ट्राच्या स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतल्या शिवाय पुढे जाऊ शकत नाही. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी या मताशी सहमत आहे.'

पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपावर आतापासून चर्चा झडत आहेत. महाविकास आघाडीसोबोतच महायुतीतून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी 23 जागांची उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची (UBT) मागणी काँग्रेसने फेटाळून लावली. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'आम्ही लोकसभेच्या 23 जागा लढवण्यावर ठाम आहोत. जागावाटपाचा फार्म्युला दिल्लीत ठरेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जागावाटपाच्या बाबतीत दिल्लीत आज चर्चेसाठी आहेत.'

राऊत म्हणाले की, "आजही शिवसेना महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. लोकांचा शिवसेना आणि शरद पवारांना पूर्ण पाठिंबा आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. शिवसेना नेहमीच 23 जागा लढत आली आहे. मागील निवडणुकीत आम्ही 19 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे 19 जागांबाबत काहीच बोलू नका. जागावाटपाबाबत काँग्रेसच्या निर्णय घेणाऱ्या नेत्यांशी आम्ही सकारात्मक चर्चा करत आहोत.' असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news