Petrol Diesel Prices | पेट्रोल, डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार?, मोदी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या तयारीत | पुढारी

Petrol Diesel Prices | पेट्रोल, डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार?, मोदी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या तयारीत

पुढारी ऑनलाईन : २०२४ च्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारचा लवकरच पेट्रोल, डिझेलच्या किमतीत कपात करण्याचा विचार आहे. पेट्रोल, डिझेल दरात प्रति लिटर ४ ते ६ रुपये कपात होण्याची शक्यता आहे, असे वृत्त बिझनेस टुडेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राची ऑइल मार्केटिंग कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. सरकार आणि ऑइल मार्केटिंग कंपन्या इंधर दर कपातीचा समान भार उचलण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल दरात प्रति लिटर १० रुपयांपर्यंत दरात कपात करू शकते. इंधन दरात कपात केल्याने किरकोळ महागाईवाढीचा वाढलेला दरही कमी होईल जो नोव्हेंबरमध्ये ५.५५ टक्क्यांच्या तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता.

पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयात याबाबत नुकतीच चर्चा झाली आहे. त्यानंतर याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे पर्याय सादर केले आहेत. ही दोन्ही मंत्रालये दर पंधरवड्याला इंधन दरांचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करतात. गेल्या तीन महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ७०-८० डॉलरच्या दरम्यान असल्याने केंद्र सरकार इंधन दर कपात करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२१ आणि मे २०२२ मध्ये दोन टप्प्यांत पेट्रोल आणि डिझेलवरील अनुक्रमे एकूण प्रति लिटर १३ रुपये आणि १६ रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क कमी केले आहे. इंधनावरील उत्पादन शुल्क कपात ही पूर्णपणे ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने करण्यात आली होती. परिणामी किरकोळ किमती घसरल्या.

कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) या तीन सरकारी तेल विपणन कंपन्यांनी या आर्थिक वर्षात मोठा नफा कमवला आहे.

गुरूवारी तेलाच्या किमती स्थिर झाल्या. ब्रेंटचा दर प्रति बॅरल ८० डॉलरच्या जवळ आला आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button