तूर, उडीद डाळीवरील आयात शुल्क सूट वाढवली | पुढारी

तूर, उडीद डाळीवरील आयात शुल्क सूट वाढवली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तूर आणि उडीद डाळीवरील आयात शुल्क सूट एक वर्षाने वाढवण्यात आहे. त्यामुळे ही मुदत आता मार्च २०२५ पर्यंत असणार आहे. यापुर्वी ही मुदत मार्च २०२४ पर्यंत होती. भारतातील अन्नधान्य महागाई वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

देशातील महागाईच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने तूर आणि उडीद डाळ आयातीवरील सवलत ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने याबाबतची सुचना जारी केली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये डाळींनी २० टक्के महागाई दर नोंदवला आहे. वर्षभरात तूर डाळीच्या उत्पादनात झालेली घट हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. दरम्यान, वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना २०२८ पर्यंत वाढवणे, गरीब कुटुंबांना मासिक ५ किलो धान्य उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त साखर, तांदूळ, डाळी, भाजीपाला आणि खाद्यतेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर काम सुरू करण्यात आले आहेत.

Back to top button