Delhi Weather | दिल्लीत दाट धुक्यामुळे ११० विमान उड्डाणे, २५ रेल्वे गाड्यांना फटका | पुढारी

Delhi Weather | दिल्लीत दाट धुक्यामुळे ११० विमान उड्डाणे, २५ रेल्वे गाड्यांना फटका

पुढारी ऑनलाईन : दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्यामुळे बुधवारी विमान सेवेला फटका बसला. बुधवारी सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणांना विलंब झाला. येथील दाट धुक्यांमुळे दृश्यमानता जवळपास शून्यावर आली.
दिल्ली विमानतळाच्या फ्लाइट इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीमच्या माहितीनुसार, “दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मिळून सुमारे ११० विमानांचे आगमन आणि त्यांना निघण्यास विलंब होत आहे.” दाट धुक्यामुळे दिल्लीतील २५ रेल्वे गाड्याही उशिराने धावत होत्या, असे ANI ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Delhi Weather)

 संबंधित बातम्या 

दिल्लीचे किमान तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात थंडीची लाट कायम आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, उत्तराखंड आणि दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानाचा पारा सतत घसरत असल्याने संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे.

दिल्लीमधील अनेक ठिकाणी दाट ते अत्यंत दाट धुके राहणार असल्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने (RMC) वर्तवली आहे. तसेच हवामान खात्याने सॅटेलाईट प्रतिमादेखील जारी केल्या आहेत. त्यात पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या उत्तर भागात धुके वेगाने पसरत असल्याचे दिसते. (Delhi Weather)

दाट धुक्यामुळे आग्रा-लखनौ मार्गावर अपघात, १ ठार, २४ जखमी

दरम्यान, आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर दाट धुक्यामुळे बुधवारी सकाळी उन्नावजवळ एक मोठा अपघात झाला. या अपघातात एकजण ठार झाला आणि सुमारे २४ लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे.
दाट धुक्यामुळे काही दिसत नसल्यामुळे एका डबलडेकर बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे बस मध्यवर्ती दुभाजकाला जाऊन धडकली. त्यानंतर किमान सहा वाहनांची एकमेकांना धडक बसली. या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर सुमारे २४ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल केले आहे. यात सहाजण गंभीर जखमी असून त्यानंतर लखनौ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.

 

Back to top button