नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये थंडीचा कडाका आणि धुके वाढल्याने विमान उड्डाणांवर आणि रेल्वे गाड्या धावण्याच्या वेळापत्रकावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. दिल्लीमध्ये आज सकाळी दाट धुक्यामुळे दृष्यमानता घटल्याने पाच विमानांना उतरविण्यात अडथळे आल्याने या विमानांना अन्यत्र वळवावे लागले. तर, जवळपास ३० विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला. दरम्यान, उत्तर भारतात १४ रेल्वे गाड्या देखील दाट धुक्यामुळे विलंबाने धावल्या.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत तापमान ९ अंश सेल्शिअसपर्यंत घसरले असून उद्या (२७ डिसेंबर) बुधवारपर्यंत काही भागात दिवसाच्या पहाटे "दाट ते खूप दाट धुके" असण्याची शक्यता आहे. तसेच पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणात धुके राहू शकते, असेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यापार्श्वभूमीवर दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दृश्यमानता ५० मिटर होती. तांत्रिकदृष्ट्या ही दृष्यमानता शून्य मानली जाते.
सकाळी साडेआठच्या सुमारास त्यात ७५ मीटरपर्यंत सुधारणा झाली असली तरी पुन्हा दृष्यमानता ५० मीटरवर स्थिरावल्याने विमाने उतरण्याच्या आणि उड्डाणांच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला. सकाळी साडेआठ ते दहा वाजेदरम्यान पाच विमाने जयूपरकडे वळवावी लागली. धावपट्टीची दृष्यमानता कमी असताना विमानांना उड्डाणांसाठी आणि उतरण्यासाठी उपयुक्त ठरणारी धुकेप्रतिरोधक अँटी-फॉग लँडिंग सिस्टम देखील सुरू केली होती. यासोबतच, संभाव्य विलंबाबाबत प्रवाशांना देखील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, दाट धुक्यामुळे दिल्लीमधील हवेचा दर्जा पुन्हा खालावला आहे. आज सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३७६ होता. या श्रेणीतील हवा अतिशय खराब मानली जाते. याचा परिणाम दिल्लीकरांच्या आरोग्यावर होऊ शकतो असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
दाट धुक्यामध्ये असलेले धुलीकण आणि प्रदूषणाचे कण फुप्फुसात अडकण्याची आणि पर्यायाने खशात खवखव, खोकला आणि श्वासोच्छवासाचा त्रास वाढण्याची, त्याचप्रमाणे डोळे चुरचुरणे, डोळ्यांना सूज येणे यासारखे विकार होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
हेही वाचा