दाट धुक्यामुळे उत्तरेतील विमान सेवेला फटका | पुढारी

दाट धुक्यामुळे उत्तरेतील विमान सेवेला फटका

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीसह उत्तरभारतात दाट धुके पसरले आहे. त्याचा परिणाम जनजीवनासह अन्य सेवांवर झाला आहे. दाट धुक्यामुळे काहीच दिसत नसल्याने दिल्लीसह 6 राज्यांतील विमान सेवेवर परिणाम झाला आहे. विमानाचे उड्डाण निश्चित झाल्यानंतर प्रवाशांनी विमानतळावर यावे, असे आवाहन इंदिरा गांधी विमानतळाकडून करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह पंजाबचे अमृतसर, उत्तरप्रदेशातील आग्रा आणि प्रयागराज, मध्य प्रदेशचे ग्वाल्हेर, राजस्थानमधील जैसलमेर येथे दाट धुके पडल्याने काहीच दिसत (झीरो व्हिजिबिलटी) नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

नवीन वर्षात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर येत्या काही दिवसांत दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि चंदीगडमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणात शीत लहरींचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच दक्षिण भारतातील हैदराबाद आणि बंगळूरमधील विमानसेवेला फटका बसला आहे. विस्तारा एअरलाईन्सने आपल्या विमानांचा मार्ग बदलण्याची घोषणा केली असून, हैदराबादहून दिल्लीला येणारी सहा उड्डाने वळवली आहेत.

नवीन वर्षाची सुरुवात पावसाने

येत्या काही दिवसांत राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडूत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात पावसाने होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Back to top button