Divorce | पतीच्या पुरुषत्वावर शंका घेणे, नपुंसकत्वाची तपासणी करायला लावणे कौर्यच – HC | पुढारी

Divorce | पतीच्या पुरुषत्वावर शंका घेणे, नपुंसकत्वाची तपासणी करायला लावणे कौर्यच - HC

पुढारी ऑनलाईन डेस्क : बायकोने नवऱ्याच्या पुरुषत्वावर शंका घेत आरोप करणे आणि नवऱ्याला नपुंसकत्वाची चाचणी करायला भाग पाडणे हा मानसिक छळ आहे, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. बायकोचे असे आरोप नवऱ्यावर मानसिक आघात करणारे ठरतात, असे न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांनी म्हटले आहे. (Divorce)

न्यायमूर्तींनी म्हटले आहे की, “याचिकाकर्ता असलेल्या बायकोने नवऱ्याला नपुसंकत्वाची चाचणी करायला लावल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचे नवऱ्याच्या पुरुषत्वावर केलेले आरोप हे नवऱ्याला नैराश्येत ढकलणारे आहेत, शिवाय मानसिक आघात करणारे ही आहेत.”

जोडीदारावर अपमानकारक, बेछूटपणे केलेले आरोप त्याच्या सार्वजनिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतात, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणात नवऱ्याला कौटुंबिक न्यायालयाने छळाच्या आधारावर घटस्फोट मंजुर केला होता. याला बायकोने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या जोडप्याचे लग्न २००० साली झाले असून दोघांना मुलगा आहे. बायको नेहमी घालूनपाडून बोलते, सासू मारहाण करते, नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप करते अशा प्रकारच्या तक्रारी नवऱ्याने केल्या होत्या. नवऱ्याने याचिकेत म्हटले होते की बायकोने तो नपुसंक असल्याचे आरोप केले होते, आणि त्याला डॉपलर टेस्ट करायला भाग पाडले होते. (Divorce)

नवऱ्याने केलेल्या डॉपलटर टेस्टबद्दल आपल्याला माहिती नाही, असा बचाव बायकोने केला होता. पण बायकोनेच ही टेस्ट करायला लावल्याचे निष्पन्न झाले. तसेच नवऱ्यावर हुंडा मागितल्याचा आरोपही सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने बायकोची याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा

Back to top button