राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये भेट, भेटीचा तपशील गुलदस्त्यात

राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये भेट, भेटीचा तपशील गुलदस्त्यात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची नवी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी भेट झाली. जवळपास २० मिनिटे चाललेल्या या भेटीत इंडिया आघाडीचा किमान समान कार्यक्रम आणि काही नव्या पक्षांचा इंडिया आघाडीत समावेश तसेच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती यावर चर्चा झाल्याचे समजते. दोनच दिवसांपुर्वी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ही भेट महत्वाची मानली जाते.

विरोधकांचे १४३ खासदार निलंबित करण्यात आल्यानंतर दिल्लीत इंडिया आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये राहुल गांधी आणि शरद पवारही उपस्थित होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकाच गाडीतून राहुल गांधी शरद पवारांच्या घरी आले. किमान समान कार्यक्रमासाठी इंडिया आघाडीतील काही लोकांनी चर्चा करावी आणि सर्वसमावेशक कार्यक्रम तयार करून त्यांनतर तो सर्वांसमोर मांडावा, असे ठरले आहे. त्यानुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, शरद पवार, सीताराम येचुरी, अधीर रंजन चौधरी आणि आणखी काही नेत्यांमध्ये ही चर्चा होणार आहे. मात्र त्यापूर्वी राहुल गांधी आणि शरद पवार या दोन नेत्यांमध्ये या विषयावर चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि आघाडीतील घडामोडी याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी (२० डिसेंबर) दिल्लीत पार पडली. यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या भेटीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाल्याचे समजते. तसेच महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्येही छोटे पक्ष आहेत, विशिष्ट भागावर किंवा समुदायावर त्यांचा प्रभाव आहे, अशा पक्षांना सोबत घेतले पाहिजे, यावरही चर्चा झाल्याचे समजते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news