Bajrang Punia : पीएम माेदींच्या घरासमोर बजरंगने फुटपाथवर ठेवला पुरस्कार | पुढारी

Bajrang Punia : पीएम माेदींच्या घरासमोर बजरंगने फुटपाथवर ठेवला पुरस्कार

पुढारी ऑनलाईन : बजरंग हा पुरस्कार परत करण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेला होता; पण आत जाण्याची परवानगी न मिळाल्याने त्याने तो पुरस्कार तिथेच फुटपाथवर ठेवला. स्वत:ला ‘अपमानित पैलवान’ म्हणवून घेणारा बजरंग पुनिया म्हणाला की, महिला कुस्तीपटूंचा अपमान केल्यानंतर तो सन्माननीय जीवन जगू शकणार नाही, म्हणून तो त्याचा सन्मान परत करत आहे. आता तो या सन्मानाच्या ओझ्याखाली जगू शकत नाही.

12 महिला कुस्तीपटूंनी माघार घेतली

जानेवारीमध्ये तक्रारदार महिला कुस्तीपटूंची संख्या 19 होती, ती एप्रिलपर्यंत 7 वर आली. म्हणजेच या 3 महिन्यांत आपल्या ताकदीच्या जोरावर बृजभूषण यांनी 12 महिला कुस्तीपटूंना आपल्या न्यायाच्या लढाईत पराभूत केले होते. हे आंदोलन 40 दिवस चालले. या 40 दिवसांत आणखी एक महिला कुस्तीगीर मागे हटली. आम्हा सर्वांवर खूप दबाव होता. आमच्या निषेध स्थळाची तोडफोड करण्यात आली आणि आमचा दिल्लीतून पाठलाग करण्यात आला आणि आमच्या निषेधावर बंदी घालण्यात आली, असेही बजरंग पुनिया याने म्हटले आहे.

मी ‘पद्मश्री’ परत करतोय… PM मोदींना पत्र लिहून बजरंगची पुरस्कार वापसी

बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध भारताच्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप करत केलेल्या आंदोलनाला बजरंग पुनियाने शेवटपर्यंत पाठिंबा दर्शवला. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्‍या बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत करीत असल्याची घोषणा केली.

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी (21 डिसेंबर) निवडणूक पार पडली. संजय सिंह यांनी या निवडणुकीत माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला. एकूण 47 जणांनी या निवडणुकीत मतदान केले. यापैकी 40 मते संजय सिंह यांच्या पारड्यात पडली, तर अनिता यांना केवळ सात मते मिळाली.

संजय सिंह अध्यक्ष होताच बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाटने नाराजी व्यक्त केली आहे. या तिघांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. आता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने एक मोठा निर्णय घेतला आहे. मी माझा पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्र्यांना परत करत आहे, असे कॅप्शन लिहीत बजरंगने एक पत्र एक्स या साईटवर पोस्ट केले आहे.

तीन पानांच्या या भल्यामोठ्या पत्रात बजरंगने आंदोलनाचा घटनाक्रम, सरकारमधील मंत्र्यांची आश्वासने, गृहमंत्र्यांची भेट आणि त्यानंतर झालेली कुस्ती संघटनेची निवडणूक या सर्वांचा उल्लेख केला आहे. याचबरोबर बृजभूषण यांच्या ‘दबदबा हैं, दबदबा रहेगा’ या वक्तव्याचादेखील उल्लेख करत बजरंगने सरकारने दिलेले पुरस्कार कसे बोचत आहेत, हे सांगितले.

2019 साली मिळाला होता ‘पद्मश्री’

बजरंग पुनियाला 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. याच वर्षी बजरंग पुनियाला ‘खेलरत्न’ पुरस्कारदेखील मिळाला होता.

पत्रास कारण की…

कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपल्या पत्रात लिहिले, आशा आहे की, तुमची प्रकृती चांगली असेल. तुम्ही देशाच्या सेवेमध्ये व्यस्त असणार. तुमच्या व्यस्ततेदरम्यान मी आपले लक्ष कुस्तीकडे वळवू इच्छितो. आपल्याला माहीतच आहे की, यावर्षी जानेवारी महिन्यात भारतीय महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. त्या महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले, तेव्हा मीही त्यात सहभागी झालो होतो. सरकारने आंदोलनकर्त्यांना ठोस आश्वासन दिल्यानंतर जानेवारी महिन्यातच कुस्तीपटू आपापल्या घरी निघून गेले. मात्र, तीन महिन्यांनंतरही बृजभूषण सिंह यांच्यावर ‘एफआयआर’ही दाखल झाला नव्हता. आता निवडणुकीतून पुन्हा त्यांचीच सत्ता कुस्ती संघटनेवर आली आहे. त्यानंतर त्यांनी ‘दबदबा हैं, दबदबा रहेगा’ अशा स्वरूपाची वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन करणार्‍या महिलांचा हा अपमान आहे. अशा परिस्थितीत मी पद्मश्री पुरस्कार विजेता ही उपाधी मला बोचते आहे.

Back to top button