घटस्‍फोटीत पती-पत्‍नी आपल्‍या मुलांसाठी चांगले पालक ठरु शकतात : उच्‍च न्‍यायालय | पुढारी

घटस्‍फोटीत पती-पत्‍नी आपल्‍या मुलांसाठी चांगले पालक ठरु शकतात : उच्‍च न्‍यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पती आणि पत्‍नी यांचे संबंध बिघडले असतील तर ते पालक म्‍हणूनही वाईट असतात, असा समज तथाकथित नैतिक समाजाने त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या वागणुकीच्‍या निकषांवर आधारित तयार केला आहे, असे स्‍पष्‍ट करत पती आणि पत्‍नी यांच्‍यातील संबंध बिघडलेले असू शकतात; परंतू याचा अर्थ असा नाही की, ते त्‍यांच्‍या मुलांसाठी वाईट पालक आहेत. घटस्‍फोटीत पती आणि पत्‍नी आपल्‍या मुलांसाठी चांगले पालक ठरु शकतात, असे निरीक्षण नुकतेच पंजाब आणि हरियाणा उच्‍च न्‍यायालयाने नोंदवले. तसेच पती आणि पत्‍नीचे नाते संपुष्‍टात आल्‍यानंतर आई किंवा वडील या दोघांपैकी एकाकडे जबाबदारी सोपविणताना अल्‍पवयीन मुलाच्‍या कल्‍याणाचा विचार महत्त्‍वाचा ठरतो, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

मुलीचा ताबा मिळविण्‍यासाठी वडिलांची उच्‍च न्‍यायालयात धाव

२००८ मध्‍ये विवाह झालेल्‍या दाम्‍पत्‍याला २०१२ मध्‍ये एक मुलगी झाली. मात्र काही वर्षांमध्‍ये पती आणि पत्‍नी मतभेद सुरु झाले. अखेर त्‍यांनी घटस्‍फोट घेतला. सत्र न्‍यायालयाने मुलीचा ताबा हा आईकडेच राहिल, असे स्‍पष्‍ट केले. या निर्णयाला पालक आणि पाल्‍य कायद्याच्या कलम 25 अंतर्गत वडिलांनी पंजाब आणि हरियाणा उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले. आपल्‍याला आपल्‍या मुलीचा ताबा मिळावा, अशी मागणी त्‍यांनी याचिकेतून केली होती.

पालकांच्‍या मागणीपेक्षा संबंधित मुलाचे हित महत्त्‍वाचे

याचिकेवरील सुनावणीवेळी न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, पती आणि पत्‍नी यांच्‍यामध्‍ये वाद होतात. यानंतर दोघेही कायदेशीररित्‍या वेगळे होऊ इच्छितात. यावेळी मुलाचा किंवा मुलीचा ताबा मिळविण्‍यासाठी दोघेही एकमेकांवर गंभीर आरोपही करु शकतात. अशा आरोपांमुळे संबंधित आई किंवा वडील मुलाच्‍या ताब्‍यावर हक्‍क सांगण्‍यास अपात्र ठरु शकतो. मात्र अशा प्रकरणात ‘संबंधित मुलाचे हित काय असेल’ या प्रश्नावर विचार केला जाईल, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

…याचा अर्थ ते वाईट पालक आहेत असा होत नाही

नातेसंबंधात पुरुष किंवा स्त्री एकमेकांसाठी वाईट असू शकते, याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती त्याच्या/तिच्या मुलासाठी वाईट असेल. पती आणि पत्‍नीचे नाते बिघडले तरी ते पालक म्‍हणून मुलासाठी चांगले असू शकते. तथाकथित नैतिकता समाजाने त्यांच्या स्वत: च्या आचार आणि निकषांवर आधारित केलेले मत पालक आणि मुलांच्‍या नातेसंबंधात प्रतिबिंबित होणे आवश्यक नाही, असेही न्‍यायालयाने आपल्‍या आदेशात म्हटले आहे.

मुलीसाठी आई सर्वात चांगली मैत्रीण

संबंधित प्रकरणातील मुलगी ही आता १० ते ११ वर्षांची आहे. वाढत्‍या वयाच्‍या मुलीसाठी आई हीच सर्वात चांगली मैत्रीण आणि मार्गदर्शक असू शकते. वयाच्‍या या टप्प्यावर मुलीला तिच्या वडिलांपेक्षा तिच्या आईची मदत आवश्यक आहे. मुलगी ही आईच्‍या ताब्‍यात राहिल, असे स्‍पष्‍ट करत उच्‍च न्‍यायालयाने संबंधित वडिलांची याचिका फेटाळली.

वडिलांना महिन्‍यातून दोनवेळा आपल्‍या मुलीला भेटण्‍याची परवानगी न्‍यायालयाने दिली. तसेच अशा भेटी दरम्‍यान दोन्‍ही पक्षांकडून एकमेकांना सहकार्य करणे आणि मुलीने आपल्‍या वडिलांशी सुसंवाद साधण्‍यासाठी आईनही अनुकूल वातारवण निर्माण करणे अपेक्षित आहे, असेही न्‍यायालयाने यावेळी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा :

 

Back to top button