प्रेमभंगातून प्रियकाराने जीवन संपवले म्‍हणून प्रेयसीवर गुन्‍हा दाखल करता येणार नाही : उच्‍च न्‍यायालय | पुढारी

प्रेमभंगातून प्रियकाराने जीवन संपवले म्‍हणून प्रेयसीवर गुन्‍हा दाखल करता येणार नाही : उच्‍च न्‍यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रियकराने प्रेमभंगातून जीवन संपवले म्‍हणून प्रेयसीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करता येणार नाही, असे निरीक्षण नुकतेच छत्तीसगड उच्‍च न्‍यायालयाने नाेंदवले आहे. तसेच या प्रकरणी २४ वर्षीय तरुणी आणि तिच्या दोन भावांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही  रद्द केला आहे.

प्रेमभंगातून तरुणाने संपवले होते जीवन

प्रेमभंग झालेल्‍या तरुणाने २३ जानेवारी २०२३ रोजी आपल्‍या घरात जीवन संपवले होते. जीवन संपविण्‍यापूर्वी त्‍याने लिहिलेल्‍या  दोन पानांच्‍या पत्रात म्‍हटलं होतं की, “माझे तरुणीसोबत ८ वर्षापांसून प्रेमंबंध होते. मात्र तिने माझ्‍यासोबतचे संबंध तोडून दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले. तरुणीच्‍या भावांनी मला धमकावले आणि त्यामुळे मी जीवन संपवत आहे.”

तरुणींसह दोन भावांवर गुन्‍हा दाखल

जीवन संपवलेल्‍या तरुणांच्‍या काकांनी छत्तीसगडमधील राजनांदगाव पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्‍यानुसार संबंधित तरुणी आणि तिच्‍या दोन भावांवर गुन्‍हा दाखल झाला. जिल्हा न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत आरोप निश्चित केले होते.

तरुणीची उच्‍च न्‍यायालयात धाव

तरुणाच्‍या मृत्‍यू प्रकरणातील संशयित बहिण आणि भावांनी आपल्‍या सत्र न्‍यायालयाने केलेल्‍या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली होती.

कमकुवत मानसिकतेच्या व्‍यक्‍तीने  घेतलेल्या चुकीच्या निर्णयासाठी…

या याचिकेवर एकल खंडपीठाचे न्‍यायमूर्ती पार्थ प्रतिम साहू यांच्‍यासमाेर सुनावणी झाली.  न्यायमूर्ती पार्थ प्रतिम साहू म्हणाले की, कमकुवत मानसिकतेच्या व्‍यक्‍तीने  घेतलेल्या चुकीच्या निर्णयासाठी, दुसर्‍या व्यक्तीवर ठपका ठेवता येणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेतील खराब कामगिरीमुळे कमी गूण मिळाले आणि प्रियकराने प्रेमातील अपयशामुळे प्रेमभंगामुळे जीवन संपवले असेल तर संबंधित शिक्षक किंवा संबंधित प्रेयसीला जबाबदार धरता येणार नाही, असेही न्यायमूर्ती साहू यांनी ७ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालात म्हटले आहे.

जीवन संपवण्‍याच्‍या पूर्वी लिहिलेल्‍या चिठ्‍ठीत स्‍पष्‍ट उल्‍लेख नाही

प्रेयसीच्‍या भावांनी दिलेल्‍या धमकीविराेधात संबंधित तरुणाने पाेलीस ठाण्‍यात तक्रार करायला हवी हाेती;  पण त्याने तसे केले नाही. तसेच जीवन संपविण्‍यापूर्वी त्‍याने लिहिलेल्‍या चिठ्‍ठीतून प्रेमात विश्वासघात झाल्यामुळे मनातील दुःखाची स्थिती व्यक्त केली गेली आहे. जीवन संपवण्‍याच्‍या पूर्वी लिहिलेल्‍या चिठ्‍ठीत प्रेयसीच्‍या कोणत्‍या वर्तनामुळे जीवन संपविण्‍याशिवाय पर्याय उरला नाही, असा स्‍पष्‍ट उल्‍लेख नाही. त्‍यामुळे संबंधित तरुणाने प्रेयसीमुळे जीवन संपवले, असा निष्‍कर्ष जाणूनबुजून काढता येणार नाही. असे स्‍पष्‍ट करत उच्‍च न्‍यायालयाने या प्रकरणातील  24 वर्षीय तरुणी आणि तिच्या दोन भावांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप रद्द केला.

हेही वाचा : 

 

Back to top button