

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडू राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्रीपासून पावसाने थैमान घातले असून, या नैसर्गिक आपत्तीत विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झालाआहे. दरम्यान, आज ( दि. १९) चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.राज्यपाल आरएन रवी आढावा बैठक घेणार आहेत.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) राज्यातील सर्वात जास्त प्रभावित असलेल्या कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि तेनकासी जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी केला आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे बेपत्ता आहेत. उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण तामिळनाडूमधील तब्बल 39 प्रदेशांमध्ये अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाने स्पष्टकेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेती, रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले असून अनेक निवासी वसाहती पाण्याखाली आल्या आहेत. तलावांना तडे गेल्याने आणि पूर आल्याने अनेक भागातील रस्त्यांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी मोबाईल फोन सेवाही विस्कळीत झाली आहे.
हवामान विभागाने म्हटले आहे की, प्रतितास ५५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने दक्षिण तमिळनाडू किनारपट्टी, मन्नारच्या आखात, कोमोरिन परिसर, लक्षद्वीप परिसरात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. आग्नेय अरबी समुद्राला लागून असणार्या ठिकाणी मच्छीमारांनी आजच्या दिवसासाठी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा :