नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ तेलंगणा राज्य मिळवता आले. या पराभवानंतर काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शनिवारी (९ डिसेंबर) राजस्थान आणि मिझोरम राज्यातील पराभवावर काँग्रेस मुख्यालयात मंथन करण्यात आले. दिल्लीस्थित कॉंग्रेस मुख्यालयात सलग दुसऱ्या दिवशी पराभवावर समिक्षा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, के सी वेणूगोपाल, दोन्ही राज्यांचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष तथा प्रमुख नेते उपस्थित होते. हा निकाल अनपेक्षित आहे, मात्र पक्षाच्या वतीने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न आम्ही केला. पूर्ण एकजुटीने आम्ही ही निवडणूक लढवली. या निवडणुकीत पराभव झाला असला तरीही नव्या उमेदीने आणि पूर्ण ताकदीने येणारी लोकसभा निवडणूक लढू, असे या बैठकीनंतर काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. तत्पूर्वी शुक्रवारी मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील पराभवावर समिक्षा करण्यात आली. (Congress Meeting)