CBSE, ICSE परीक्षा ऑफलाईनच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय | पुढारी

CBSE, ICSE परीक्षा ऑफलाईनच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : CBSE, ISCE Exams : शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) बोर्ड टर्म १ च्या परीक्षा हायब्रिड पद्धतीने घेण्याची विद्यार्थ्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. टर्म १ बोर्डाच्या परीक्षा आता फक्त ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देण्याचा पर्याय नसेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. परीक्षेत योग्य पद्धतीने कोरोना प्रोटोकॉलचे पालन होत असल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठाने निर्णय दिला.

सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या टर्म १ परीक्षांसाठी ऑनलाईन परीक्षांचाही पर्याय द्यावा अशी मागणी करणारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आज त्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने म्हणण्यानुसार, सीबीएसईच्या ऑफलाइन परीक्षांना सुरुवात झाली आहेत. त्या ऑफलाईन पद्धतीनेच होत असून अशा पद्धतीने आयत्या वेळी कोणताही आक्षेप नोंदवणे योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांनी ऑक्टोबर महिन्यातच जाहीर केले होते. त्यानंतर सहा विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार सीबीएसई आणि आयसीएसीद्वारे आयोजित टर्म १ परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना केवळ ऑफलाईन परीक्षांचा पर्याय दिला आहे. कोविड-१९ मुळे ऑनलाइन परीक्षा देण्याचा पर्यायसुद्ध विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असल्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. पण ऑनलाईन परीक्षांच्या पर्यायाची शक्यता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी न्यायालयाला विद्यार्थ्यांची बाजू मांडली. ते म्हणाले की, कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही आणि परीक्षा ऑफलाइन होतील हे सांगणे घाईचे आहे. हा विषाणू मुलांमध्ये पसरू शकतो. याचा परिणाम १४ लाख मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळेच परीक्षा घेण्यात ऑफलाईनचा पर्यायही असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकाच्या बाजूने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले की, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, गेल्या वर्षी हायब्रीड पद्धतीने परीक्षा झाली नव्हती. दहावीत १४ लाख तर बारावीत २० लाख विद्यार्थी आहेत. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी परीक्षा सुरू झाल्या आहेत, ज्याची नोटीस ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आली होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व योग्य पद्धतीने काळजी घेण्यात आली आहे. परीक्षेसाठी १५ हजार परीक्षा केंद्रांची व्यवस्था केली आहे. परीक्षेला एकूण ४० लाख विद्यार्थी बसतील. मागील परीक्षा देण्यासठी एका वर्गात ४० विद्यार्थी बसले होते. पण यावेळी केवळ १२ विद्यार्थी एका वर्गात बसतील. परीक्षेचा कालावधी कमी करण्यात आला आहे.

Back to top button