पुढारी ऑनलाईन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) पतविषयक धोरण जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर निफ्टी ५० ने आज शुक्रवारी (दि.८) इतिहास रचला. आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी प्रथमच २१ हजारांवर पोहोचला तर सेन्सेक्स ७० हजारांच्या जवळ गेला. आरबीआयने रेपो रेट ६.५० टक्के एवढा कायम ठेवला आहे. आरबीआयच्या घोषणेच्या काही सेकंद आधी निफ्टी ५० ने २१ हजारांवर व्यवहार करत उच्चांक गाठला. तसेच दोन्ही निर्देशांकांच्या उच्चांकी वाढीला आयटी आणि इंडेक्स हेवीवेट एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील तेजीचा सपोर्ट मिळाला. सेन्सेक्स आज ३०३ अंकांनी वाढून ६९,८२५ वर बंद झाला. तर निफ्टी ६८ अंकांच्या वाढीसह २०,९६९ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)
गेल्या काही दिवसांपासून बाजारात तेजी राहिली आहे. पण सात दिवसांतील तेजीला काल ब्रेक लागला होता. पण आज पुन्हा बाजारात तेजी परतली आणि सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक गाठला.
संबंधित बातम्या
क्षेत्रीय आघाडीवर एफएमसीजी, ऑईल आणि गॅस, पॉवर निर्देशांक प्रत्येकी १ टक्के, हेल्थ केअर आणि ऑटो प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे बँका, आयटी आणि रियल्टी ०.५-१ टक्क्यांनी वधारले. बीएसई मिडकॅप निर्देशांक किरकोळ घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला.
आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढ ७ टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी ६.५ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज समोर आला होता. तर महागाईचा अंदाज ५.४ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. दरम्यान, आरबीआयच्या या निर्णयानंतर व्याजदराशी निगडीत बँका, फायनान्सियल सर्व्हिसेस, पब्लिक सेक्टर बँका यांचे शेअर्स वाढले.
सेन्सेक्सवर एचसीएल टेकचा शेअर टॉप गेनर
आशियाई बाजारातून कमकुवत संकेत असतानाही भारतीय बाजारात आज तेजीचा माहौल राहिला. सेन्सेक्स आज ६९,६६६ अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर तो ६९,८९३ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर एचसीएल टेकचा शेअर सुमारे ३ टक्क्यांनी वाढून १,३६४ रुपयांवर पोहोचला. जेएसडब्ल्यूचा शेअर २ टक्क्यांहून अधिक वाढून ८३८ रुपयांवर गेला. त्याचबरोबर इन्फोसिस, टायटन, एचडीएफसी बँक, विप्रो, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्सही वधारले. दरम्यान, आयटीसी, एम अँड एम, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, मारुती हे शेअर्स घसरले.
निफ्टी ५० आज २०,९३४ वर खुला झाला होता. त्यानंतर तो २१,००६ वर पोहोचला. त्यानंतर त्याने २०,८०० च्या पातळीवर व्यवहार केला. निफ्टीवर एचसीएल टेक, जेएसडब्ल्यू स्टील, LTIMindtree, इन्फोसिस, अपोलो हॉस्पिटल हे टॉप गेनर्स राहिले. हे शेअर्स १.५५ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर अदानी एंटरप्रायजेस, आयटीसी, अदानी पोर्ट्स, एम अँड एम आणि हिरो मोटोकॉर्प हे टॉप लूजर्स ठरले. (Stock Market Closing Bell)
केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर घातलेल्या निर्बंधानंतर आज शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी साखर कंपन्यांचे शेअर्स घसरले. यात सर्वाधिक फटका श्री रेणुका शुगर्सला बसला. श्री रेणुका शुगर्सचे शेअर्स सुमारे ७ टक्क्यांनी घसरले. बलरामपूर चिनी, राणा शुगर, द उगार शुगर वर्क्स आणि द्वारिकेश शुगर यांचे शेअर्स ३ टक्क्यांपर्यंत घसरले. सरकारने गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे, इथेनॉलचे उत्पादन कमी करून साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी साखर कारखान्यांनी उसाचा रस अथवा सिरीपचा इथेनॉल उत्पादनासाठी वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत.