PM Modi : ‘जी’ नको, मला फक्त मोदी म्हणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Modi : ‘जी’ नको, मला फक्त मोदी म्हणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजपमध्ये पक्ष संघटनाच सर्वोच्च आहे. कोणताही नेता पक्ष संघटनेपेक्षा मोठा नाही, असे स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्याला मोदीजी नको तर फक्त मोदी म्हणा, असे आवाहन मंत्रिमंडळातील तसेच पक्षातील सहकार्‍यांना आणि खासदारांना केले. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी सर्वांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. (PM Modi)

संसद अधिवेशनादरम्यान दर आठवड्याला भाजप संसदीय पक्षाची बैठक घेतली जाते. या बैठकीत संसदेतील नियोजन आणि पक्ष संघटनेचे कार्यक्रम यावर पंतप्रधान मार्गदर्शन करतात. या पार्श्वभूमीवर भाजप संसदीय पक्षाच्या हिवाळी अधिवेशनातील पहिल्या बैठकीला पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल यांच्यासह सर्व बडे नेते आणि भाजप खासदार उपस्थित होते. बैठकीसाठी पंतप्रधान मोदी सभागृहात आले तेव्हा व्यासपीठावरून मोदीजी का स्वागत है, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकांमधील यशाबद्दल नड्डा यांनी पंतप्रधान मोदी यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी वक्त्यांनी त्यांचा उल्लेख मोदीजी असा केला. त्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोक ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत बोला. मोदीजी की गॅरंटी नव्हे तर मोदी की गॅरंटी म्हणा. जी नको, श्री नको, फक्त मोदी म्हणा. मोदीजी याऐवजी मोदी म्हटल्याने अधिक जवळीक वाटते. भाजपमध्ये पक्ष संघटनाच सर्वोच्च आहे. कोणताही नेता पक्ष संघटनेपेक्षा मोठा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (PM Modi)

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमधील विजयाव्यतिरिक्त भाजपची ताकद मिझोराम आणि तेलंगणामध्येही वाढल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. राज्यांमध्ये पुन्हा सत्तेत येण्यात भाजपच्या यशाचे प्रमाण 58 टक्के असून, काँग्रेसच्या यशाचे प्रमाण केवळ 18 टक्के आहे. त्यामुळे सर्व खासदारांनी लाभार्थ्यांशी संपर्क साधून सरकारच्या योजनांबद्दल त्यांना सांगावे आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करावी. विश्वकर्मा योजना घराघरांत पोहोचवावी, केंद्रीय योजना लोकांपर्यंत न्याव्यात. विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व खासदारांनी आपापल्या भागातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. मात्र, स्वतःही त्यासाठी मैदानात उतरावे, अशा सूचनाही पंतप्रधान मोदींनी केल्या.

हा विजय मेहनत आणि टीमवर्कचा

भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी जीवापाड घेतलेली मेहनत आणि सांघिक प्रयत्न यामुळे तिन्ही राज्यांत भाजपला दणदणीत विजय मिळाला, असे गौरवोद्गार मोदी यांनी याप्रसंगी काढले. ते म्हणाले, हा विजय तमाम कार्यकर्त्यांचा असून त्यामागे केवळ एका व्यक्तीचे कष्ट नाहीत. आपल्यासाठी महिला, तरुण, गरीब, शेतकरी या चार जाती आहेत. आपण जातीपातींमध्ये विभागले जाता कामा नये.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news