Manipur Fresh Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; दोन गटात झालेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू | पुढारी

Manipur Fresh Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; दोन गटात झालेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क: मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना अद्याप थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्यात ७ महिन्यांनंतर इंटरनेट सुरू होताच, परिस्थिती आणखी बिघडली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या ताज्या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआयने ट्विटरवरून दिले आहे.  (Manipur Fresh Violence)

सात महिन्यांनंतर रविवारीच (दि.३) राज्यात मोबाईल इंटरनेट सेवेवरील बंदी उठवण्यात आली. त्यानंतर ही हिंसक घटना घडली आहे. सायबोलजवळील (जि.-तेंगनौपल) लेथिथू गावात दोन गटांमध्ये जोरदार गोळीबार झाला. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरमधील काही जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात अजूनही निर्बंध कायम आहेत. (Manipur Fresh Violence)

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे, या ठिकाणापासून जवळपास सुमारे 10 किमी दूर सुरक्षा दल तैनात होते. दरम्यान येथील सैन्य दलाने पुढे सरकून घटनास्थळी पोहचले असता, त्यांना लेथिथू गावात १३ मृतदेह सापडले असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.

मणिपूरमध्ये हिंसाचार कधीपासून  सुरू झाला

३ मे पासून मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी यांच्यातील जातीय संघर्षातून हिंसाचार पेटला. या जातीय हिंसाचारामध्ये आतापर्यंत किमान १८२ लोक मारले गेले. तसेच सुमारे ५० हजार लोक बेघर झाले. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये ३ मेपासून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. २३ सप्टेंबर दरम्यान काही काळासाठी पुन्हा इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली, मात्र पुन्हा २६ सप्टेंबर रोजी  इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर रविवारी (दि.३ डिसें) इंटरनेट सेवा सुरू होताच, ही हिंसाचाराची ताजी घटना घडली आहे.

हेही वाचा:

Back to top button