Terrorist Sajid Mir Poisoned : 26/11 हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीरवर पाकिस्तानच्या जेलमध्ये विषप्रयोग, प्रकृती गंभीर | पुढारी

Terrorist Sajid Mir Poisoned : 26/11 हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीरवर पाकिस्तानच्या जेलमध्ये विषप्रयोग, प्रकृती गंभीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Terrorist Sajid Mir Poisoned : मुंबई 26/11 हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असणा-या साजिद मिर या दहशतवाद्यावर पाकिस्तानातील जेलमध्ये विषप्रयोग करण्यात आला आहे. डेरा गाझी खान सेंट्रल जेलमध्ये अज्ञात व्यक्तीने त्याला विष दिले. दहशतवादी साजिद मिर हा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड होता.

काही महिन्यांपूर्वी साजिद मिरला लाहोर सेंट्रल जेलमधून डेरा गाझी खान सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले होते. विष प्रयोग केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयने त्याला एअरलिफ्ट करून सीएमएच बहावलपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तो व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे.

तपास यंत्रणांनी या घटनेचा तपास सुरू केला असून यादरम्यान त्यांना ऑक्टोबर 2023 पासून सेंट्रल जेल डेरा गाझी खानच्या स्वयंपाकघरात काम करणारा एक खाजगी स्वयंपाकी बेपत्ता असल्याचे समजले. पाकिस्तानी एजन्सी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

साजिद मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी

साजिद मिर हा दहशवादी मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील एक आरोपी आहे. पाकिस्तानातील लष्कर-ए-तैय्यब या दहशतवादी संघटनेचा तो भाग आहे. या दहशवादी संघटनांनी 2008 साली हा दहशवादी कट मुंबईत रचला होता. त्यावेळी त्यांनी कामा रुग्णालय, कॅफे, रेल्वे स्थानक यांसारख्या अनेक जागांवर हल्ला केला होता. यामध्ये 170 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तसेच या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले होते.

दहशतवादी साजिदची चीनने केली होती पाठराखण, UN मध्ये केला होता ‘वीटो’चा वापर

साजिदच्या विरोधात 21 एप्रिल 2011 रोजी युनाईटेड स्टेट्सच्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अनेक आरोप करण्यात आले होते. परदेशी सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचा कट रचणे, दहशतवाद्यांना मदत करणे, अमेरिकेच्या बाहेर अमेरिकेतील नागरिकांची हत्या करणे, सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट करणे असे आरोप त्याच्यावर करण्यात आले होते. अमेरिकेने 22 एप्रिल 2011 रोजी साजिद मिर विरोधात अटक वॉरंट देखील जारी केले होते.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चीनने साजिद मिरला संयुक्त राष्ट्रात दहशतवीद्यांच्या यादीत नाव टाकण्याचा प्रस्तावाला स्थगिती दिली होती. दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या युएनच्या सभे चीनने पुन्हा या प्रकरणात वीटोचा अधिकार वापरत हा प्रस्ताव थांबवला होता. पाकिस्तानातील दहशतवाद्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावाला चीनने याआधीही अनेकदा विरोध दर्शवला आहे.

Back to top button