पुणे : पुढज्ञारी वृत्तसेवा : कर्वेनगर आणि वारजे परिसरात दोन व्यक्तींचे मृतदेह गुरुवारी आढळून आले. त्यातील एकाची ओळख पटली असून, दुसर्याची ओळख पटविण्याचे काम पोलिस करीत आहेत. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कर्वेनगर ब्रिजजवळ पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. सकाळी ठेकेदार खड्ड्यात साचलेले पाणी काढण्यासाठी आला होता. त्या वेळी त्यांना खड्ड्यात एका व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. वारजे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्या वेळी एक व्यक्ती खड्ड्यात मृतावस्थेत मिळून आला. तसेच दारूची बाटलीदेखील तेथे आढळून आली. अभिजित दिगंबर पांगुळ (वय 32, रा. कर्वेनगर) असे त्याचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन असून, तो फिरस्ता आहे. रात्री दारू प्यायल्यानंतर खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ससून रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे यांनी दिली.
तर दुसर्या व्यक्तीचा मृतदेह वारजे चौक साईबाबा मंदिराशेजारी मिळून आला आहे. त्याची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्याने अंगावर काळ्या रेषा असलेला लाल रंगाचा शर्ट परिधान केला आहे. याबाबत कोणाला काही अधिक माहिती मिळल्यास त्यांनी वारजे माळवाडी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले
हेही वाचा