Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ६६,९८८ वर बंद, Tata Tech १६८ टक्क्यांनी वाढला, आज काय घडलं? | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ६६,९८८ वर बंद, Tata Tech १६८ टक्क्यांनी वाढला, आज काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : दोन दिवसांच्या तेजीनंतर भारतीय शेअर बाजारात आज गुरुवारी (दि.३०) चढ-उतार दिसून आला. आज सेन्सेक्स ८६ अंकांनी वाढून ६६,९८८ वर बंद झाला. तर निफ्टी ३६ अंकांच्या वाढीसह २०,१३३ वर स्थिरावला. अमेरिकेच्या बाजारातील सूस्त स्थितीचे पडसाद आज भारतीय बाजारातही काही प्रमाणात दिसून आले. विशेषतः एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्समधील घसरणीचा बाजाराला फटका बसला. तर फार्मा आणि कन्झूमर ड्यूराबल्स स्टॉक्स वाढले. तर बँकिंग आणि रियल्टी क्षेत्रात दबाव दिसून आला. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

क्षेत्रीय पातळीवर PSU बँक निर्देशांक १.५ टक्क्यांनी घसरला, तर फार्मा, कॅपिटल गुड्स, रियल्टी, ऑईल आणि गॅस निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.७ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक १ टक्क्याने वधारला.

सेन्सेक्सवर आज अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, सन फार्मा, भारती एअरटेल, एम अँड एम, टायटन, विप्रो, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एलटी, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स वाढले. तर इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, रिलायन्स, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, टीसीएस, इन्फोसिस, एसबीआय हे शेअर्स घसरले.

बंपर लिस्टिंगनंतर टाटा टेक IPO १६८ टक्क्यांनी वाढला

टाटा टेक्नॉलॉजीसच्या (Tata Technologies stock) ‘आयपीओ’ने शेअर बाजारात आज जोरदार एन्ट्री केली. Tata Technologies च्या शेअर्सने आज ट्रेडिंग पदार्पणात इश्यू प्राइसपेक्षा १६८ टक्क्यांवी वाढला. यामुळे ही भारतातील सातव्या क्रमांकाची सर्वाधिक सूचीबद्ध कंपनी बनली आहे. हा शेअर १४० टक्के प्रीमियमसह खुला झाला आणि काही मिनिटांतच त्याने बीएसईवर १,३३४ रुपयांवर व्यवहार केला, जो त्याच्या इश्यू किमतीपेक्षा १६८ टक्क्यांनी वाढला. यामुळे टाटा टेक्नॉलॉजीचे मूल्य ६.८ अब्ज डॉलल जवळ पोहोचले.

सुमारे १९ वर्षानंतर प्रथमच बाजारात आलेला टाटा समुहातील या कंपनीचा IPO ऑफर फॉर सेल इश्यू असूनही त्याला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. हा शेअर NSE वर १,२०० रुपयांवर आणि BSE वर १,१९९.९५ रुपयांवर खुला झाला होता. तर त्याची इश्यू प्राइस ५०० रुपये होती. काही मिनिटांतच हा IPO किमतीच्या तुलनेत १६८ टक्क्यांनी वाढून १,३३४ रुपयांवर पोहोचला.

गंधार ऑइल रिफायनरीच्या IPO लाही चांगला प्रतिसाद

गंधार ऑइल रिफायनरी च्या शेअर्सनी गुरुवारच्या व्यवहारात एनएसईवर ७६ टक्क्यांच्या (१२९ रुपयांनी वाढून) प्रीमियमवर पदार्पण केले. एनएसईवर हा शेअर २९८ रुपयांवर लिस्ट झाला, तर बीएसईवर त्याने २९५.४० रुपयांवर व्यवहार सुरु केला. तो १६९ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत ७५ टक्क्यांनी वाढून व्यवहार केला.

दोन दिवसांच्या तेजीनंतर अदानींच्या शेअर्समध्ये नफा वसुली

सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर आज अदानी समूहाच्या शेअर्समध्ये नफा वसुली दिसून आली. ज्यामुळे त्यांचे शेअर्स घसरले. गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांत अदानी समुहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये ३८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. पण आज गुंतवणूकदारांनी नफा वसुलीचा पर्याय निवडला. ज्यामुळे त्यांचे शेअर्स ५ टक्क्यांपर्यंत घसरले. अदानी टोटल गॅसचा (Adani Total Gas shares) शेअर एनएसईवर ५ टक्क्यांनी घसरून ६९२ रुपयांवर आला. तर अदानी पॉवरचा शेअर ३ टक्क्यांहून अधिक घसरून ४१७ रुपयांच्या दिवसाच्या निच्चांकावर आला. या वर्षात अदानी पॉवर शेअर्सने चांगली कामगिरी केली होती. या वर्षी हा शेअर सुमारे ४२ टक्क्यांनी वाढला आहे. (Stock Market Closing Bell)

Back to top button