Uttarkashi Tunnel Rescue | अरनॉल्ड डिक्स कोण आहेत? जे ४१ कामगारांच्या सुटकेसाठी बाबा बौख नाग देवतेसमोर झाले होते नतमस्तक | पुढारी

Uttarkashi Tunnel Rescue | अरनॉल्ड डिक्स कोण आहेत? जे ४१ कामगारांच्या सुटकेसाठी बाबा बौख नाग देवतेसमोर झाले होते नतमस्तक

पुढारी ऑनलाईन : उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांच्या सुखरुप सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ (Tunnelling expert Arnold Dix) अरनॉल्ड डिक्स यांनी महत्त्वाचे योगदान दिले. डिक्स हे स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय टनलिंग आणि अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख आहेत. त्यांनी काल सिल्क्यारा बोगद्याच्या बाहेर बनवलेल्या बाबा बौख नाग देवतेसमोर कामगारांच्या सुटकेसाठी नतमस्तक होत प्रार्थना केली होती. (Uttarkashi Tunnel Rescue)

संबंधित बातम्या 

सर्व ४१ कामगारांची यशस्वी सुटका केल्याबद्दल, अरनॉल्ड डिक्स म्हणाले की, “सेवा देणे हा माझा सन्मान आहे आणि एक पालक म्हणून सर्व पालकांच्या घरी त्यांच्या मुलांना पोहोचवण्यास मदत करणे हा माझा सन्मान आहे. मी सुरुवातीला म्हणालो होतो, ४१ लोक सुखरुप आहेत आणि ख्रिसमसमुळे कोणालाही दुखापत होणार नाही. ख्रिसमस लवकरच येत आहे… आम्ही शांत राहिलो आणि आम्हाला नक्की काय हवे आहे हे आम्हाला ठाऊक होते. आम्ही एक अद्भुत टीम म्हणून काम केले. भारताकडे सर्वोत्तम अभियंते आहेत. या यशस्वी मोहिमेचा भाग बनणे हा केवळ एक आनंदायी क्षण होता. मला आता मंदिरात जावे लागले. कारण मी धन्यवाद म्हणण्याचे वचन दिले होते. ते पूर्ण करणार आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण आम्ही केवळ एक चमत्कार पाहिला आहे.”

सिल्क्यारा बोगद्यातून सर्व ४१ कामगारांची यशस्वी सुटका केल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भारतीय प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. त्यावर बोलताना अरनॉल्ड डिक्स यांनी सांगितले की, “धन्यवाद, पंतप्रधान… आम्ही कवेळ क्रिकेटमध्येच उत्तम नाही, तर आम्ही बोगद्यातील बचावासह इतर गोष्टी देखील करतो. ४१ लोक बोगद्यातून बाहेर आले आहेत, सर्व सुरक्षित आहेत. सर्व काही परिपूर्ण आहे.”

कोण आहेत अरनॉल्ड डिक्स?

अरनॉल्ड डिक्स हे भूमिगत बोगद्यांतील सुरक्षेबाबत जगातील आघाडीचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. ते स्वित्झर्लंडमधील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय टनेलिंग आणि अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ते मुळचे ऑस्ट्रेलियाचे आहेत. तीन दशकांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अभियांत्रिकी, भूविज्ञान, कायदा आणि जोखीम व्यवस्थापन यावर महत्त्वाचे काम केले आहे. प्रो. अरनॉल्ड डिक्स हे भूमिगत आणि वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये माहिर आहेत. (Uttarkashi Tunnel Rescue)

ते भूमिगत बांधकामाशी संबंधित जोखमींबद्दल सल्लादेखील देतात आणि भूमिगत बोगद्यावरील जगातील आघाडीचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर लगेचच डिक्स यांनी बोगद्याच्या जागेची पाहणी केली आणि बचावकार्यात सहभागी असलेल्या एजन्सीशी चर्चा केली. आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अनेक एजन्सी आणि पर्याय तयार असल्याने कामगार सुखरूप बाहेर येतील असा डिक्स यांना विश्वास होता आणि तो खरा ठरला.

२०११ मध्‍ये त्‍यांना बोगद्यातील अग्निसुरक्षेच्या कामाबद्दल अॅलन नेयलँड ऑस्‍ट्रॅलेशियन टनेलिंग सोसायटीचा पुरस्कार मिळाला होता. २०२२ मध्ये त्यांना अमेरिकेच्या नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशनने समिती सेवा पुरस्काराने सन्मानित केले होते.

Back to top button