UAE News | भारतीय कामगाराचे दुबईत नशीब पालटले, तब्बल ४५ कोटींची लॉटरी जिंकली | पुढारी

UAE News | भारतीय कामगाराचे दुबईत नशीब पालटले, तब्बल ४५ कोटींची लॉटरी जिंकली

पुढारी ऑनलाईन : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये एका भारतीय व्यक्तीचे नशीब पालटले आहे. तेल आणि वायू उद्योगात कंट्रोल रूम ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीने तब्बल ४५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. श्रीजू असे त्याचे नाव आहे. ज्याने २०,०००,००० दिरहम (सुमारे रु. ४५ कोटी) महजूझ सॅटर्डे मिलियन्स (Mahzooz Saturday Millions) लॉटरी जिंकली आहे. याबाबतची घोषणा बुधवारी १५४ व्या सोडतीत करण्यात आली. (UAE News)

संबंधित बातम्या 

३९ वर्षीय श्रीजू हा केरळचा असून तो गेल्या ११ वर्षांपासून दुबईच्या पूर्वेला सुमारे १२० किमी अंतरावर असलेल्या फुजैराह येथे राहतो. त्याला कामावर असताना लॉटरी जिंकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला की, एवढी मोठी लॉटरी ऐकून आपल्याला धक्काच बसला. हे जाणून आश्चर्यचकित झाले की आपण केवळ बक्षीसच नाही तर अव्वल पारितोषिकही जिंकले आहे.

“मी माझ्या कारमध्ये होतो तेव्हा मी माझे महजूझ अकाऊंट तपासले आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मी बक्षिस जिंकल्याचे पाहिल्यावर काय करावे याबद्दल मी संभ्रमात होतो. मला लॉटरी लागल्याची खात्री करण्यासाठी मी महजूझच्या कॉलची वाट पाहत होतो.” असे श्रीजूने गल्फ न्यूजशी बोलताना म्हटले आहे.

श्रीजू याला सहा वर्षाची जुळी मुले आहेत. आता भारतात घर खरेदी करण्याची त्यांची इच्छा आहे.

“आजपर्यंत आमच्या साप्ताहिक ड्रॉने ६४ जण लक्षाधीश झाले आहेत आणि १,१०७,००० पेक्षा जास्त विजेत्यांना जवळपास अर्धा अब्ज दिरहम वितरित केले आहेत,” असे कम्युनिकेशन्सचे प्रमुख आणि महजूझ सॅटर्डे मिलियन्सच्या सीएसआर सुझान काझी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गेल्या शनिवारी Emirates Draw FAST5 सह आणखी एका भारतीयाने राफल बक्षीस जिंकले होते, असे गल्फ न्यूजने म्हटले आहे. मुळचा केरळचा आणि दुबईमध्ये राहणारा ३६ वर्षीय खरेदी व्यावसायिक सरथ शिवदासन याने सहभागी झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत सुमारे ११ लाखांचे बक्षीस जिंकले होते. यापूर्वी ९ नोव्हेंबर रोजी गेल्या शनिवारच्या एमिरेट्स ड्रॉच्या FAST5 गेमच्या विजेत्यांमध्ये भारताचा मनोज भावसार याचा समावेश असल्याचे वृत्त गल्फ न्यूजने दिले होते.

मुंबईतील ४२ वर्षीय इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ भावसार गेल्या १६ वर्षांपासून अबुधाबीमध्ये राहतो. FAST5 रॅफलमध्ये त्याने सुमारे १६ लाख रुपये जिंकले होते. “अभिनंदनाचा ईमेल मिळताच मी माझ्या आईला फोन केला, पण मी ही बातमी काही काळासाठी गुप्त ठेवली. त्याऐवजी, मी तिला थेट ड्रॉ स्ट्रीम पाहण्यास सांगितले आणि ज्या क्षणी तिने माझे नाव स्क्रीनवर पाहिले त्या क्षणी ती आर्श्चचकित झाली. तिला खूप आनंद झाला.” असे भावसार यांनी म्हटले. गेल्या दोन वर्षांपासून त्याच्यावर असलेले कर्ज फेडण्याचे त्याने ठरवले आहे.

भारतीय शिपिंग व्यवस्थापक अनिल ज्ञानचंदानी यांनी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित दुबई ड्यूटी फ्री मिलेनियम मिलेनियर प्रमोशनमध्ये १ दशलक्ष डॉलर जिंकले होते.

लॉटरीच्या तिकिटांचे सर्वाधिक खरेदीदार भारतीय नागरिक आहेत, असे एका अहवालात म्हटले आहे. ८ नोव्हेंबर रोजीच्या दुसर्‍या एका अहवालात असे म्हटले आहे की महजूझ सॅटर्डे मिलियन्सच्या विजेत्यांमध्ये प्रत्येकी १,००,००० (सुमारे २२ लाख रुपये) मिळविणाऱ्यांमध्ये दोन भारतीय आहेत, त्यापैकी एक यूएईमधील आहे.

Back to top button