लवंगी मिरची : अशी लॉटरी लागेल काय? | पुढारी

लवंगी मिरची : अशी लॉटरी लागेल काय?

हे बघ मित्रा, ही बातमी वाचलीस का? भास्कर माझी नावाच्या पश्चिम बंगालमधील एका शेतमजुराला चक्क एक कोटी लोक रुपयांची लॉटरी लागली म्हणे. झाले असे की, तो गेली दहा वर्षे लॉटरीची तिकिटे घेत होता. त्यादिवशी नेमके त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याने दुसर्‍या मित्राकडून चाळीस रुपये उधार घेतले आणि लॉटरीचे तिकीट खरेदी केले. ‘भगवान देता है तो छप्पर फाडके देता है,’ या म्हणीप्रमाणे त्याच दिवशी दुपारी त्याला एक कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे जाहीर झाले. मी काय म्हणतो मित्रा. आपल्याला अशी काही लॉटरी लागेल काय? की आपण वर्षानुवर्षे असंच वाट बघत बसायचे?

लागेल ना लागेल. तिकीट खरेदी करून तुला-मला लॉटरी लागणे शक्य नाही; पण येत्या काळामध्ये झपाट्याने विकास झाला तर मात्र तो लॉटरी लागल्यासारखाच आहे. मला असे वाटते की, आता भारतीय लोकांनी लॉटरीचे तिकीट खरेदी करून लॉटरीची वाट पाहण्यापेक्षा योग्य मतदान करून विकासाची लॉटरी मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

ही कोणती नवीन विकासाची लॉटरी काढली आहेस? आणि ही काय लॉटरी असते की काय?

संबंधित बातम्या

वर्षानुवर्षे विकास झाला नाही आणि अचानक विकासाच्या मुद्द्यावर जर राजकारण व्हायला लागले, तर आपण भारतीय लोकांनी त्याला लॉटरीच समजले पाहिजे, असे मला वाटते. म्हणजे बघ, गेली कितीतरी वर्षे भव्य-दिव्य रस्ते आपण कधी पाहिले नव्हते. भारतीय रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे अडथळ्यांची शर्यत होती. वाहनांची नादुरुस्ती होणे आणि पाठीचे मणके मोकळे होणे, एवढेच होते. आज हजारो किलोमीटरचे रस्ते होत आहेत. कमीत कमी अपघात, जास्तीत जास्त सुरक्षा, कमी इंधन जास्त प्रवास, हे काही अशात पाहण्यात येते आहे ही लॉटरी नाही, तर काय आहे? भास्कर माझीला लागलेली लॉटरी ही त्याची व्यक्तिगत होती. आता इथे आपल्या प्रत्येकाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. आपल्याला आता वाट आहे ती फक्त विकासाच्या लॉटरीची. एकदा का ही लॉटरी लागली की, पुन्हा मागे वळून पाहायला नको.

हो, तू म्हणतोस ते बरोबर आहे. प्रगती मात्र झपाट्याने होत आहे हे नक्की. जगभरात भारताच्या प्रगतीचा बोलबाला आहे, ही एक प्रकारची लॉटरीच आहे. देश जगामध्ये पाचव्या क्रमांकावरची महासत्ता झाला आहे, ही एक प्रकारची लॉटरीच आहे.

अरे, हे तर काहीच नाही. कॅनडाच्या पंतप्रधानाने आगाऊपणा केला म्हणून त्या देशाच्या दूतावासामधील 40 कर्मचारी परत त्यांच्या देशाला पाठवण्याचे धाडस हीसुद्धा लॉटरीच आहे. आपल्या देशावर सतत कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तान झपाट्याने रसातळाला जात आहे, हीसुद्धा एक लॉटरीच आहे. पाकिस्तान दिवाळखोर होणे आणि या गोष्टीला लॉटरी लागली म्हणणे, हे मला समजले नाही. या दोन्हींचा काय संबंध आहे?

Back to top button