म्यानमारमध्‍ये लष्‍कराचा हवाई हल्‍ला, दोन हजारांहून अधिक लाेक भारतात आश्रयाला | पुढारी

म्यानमारमध्‍ये लष्‍कराचा हवाई हल्‍ला, दोन हजारांहून अधिक लाेक भारतात आश्रयाला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत-म्यानमार सीमावर्ती भागात म्यानमार (Myanmar)  सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर म्यानमारमधील सुमारे दोन हजार नागरिकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे, अशी माहिती चंफई जिल्ह्याचे उपायुक्त जेम्स लालरिंचन यांनी ‘एएनआय’ला दिली. सध्या राज्याच्या विविध भागात ३१३६४ नागरिक वास्तव्यास आहेत.

म्यानमार लष्कराच्या हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक म्यानमार नागरिकांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून मिझोरामच्या चांफई जिल्ह्यात प्रवेश केला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही लालरिंचन यांनी सांगितले.

म्‍यानमारमध्‍ये बंडखोर आणि लष्‍करामध्‍ये धुमश्‍चक्री

म्यानमारमधील सत्ताधारी जंटा-समर्थित सैन्य आणि मिलिशिया ग्रुप पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) यांच्यात जोरदार गोळीबार झाला. पीडीएफने म्यानमारच्या खावमवी आणि रिखावदार येथील दोन लष्करी तळांवर हल्ला केल्यावर धुमश्‍चक्री सुरु झाली. म्यानमारचा रिखावदार लष्करी तळ सोमवारी पहाटे पीपल्स डिफेन्स फोर्सने ताब्यात घेतला आणि खावमावी लष्करी तळावरही दुपारपर्यंत नियंत्रण ठेवले. आता मिझोराममध्ये तीस हजारांहून अधिक म्यानमारचे नागरिक दाखल झाल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
सध्या राज्याच्या विविध भागात ३१,३६४ नागरिक राहत आहेत. अधिक निर्वासित छावण्यांमध्ये राहत आहेत.

‘पीडीएफ’चे म्‍यानमारमधील लष्करी राजवटीविरुद्ध युद्ध

पीपल्स डिफेन्स फोर्सने म्यानमारमधील लष्करी राजवटीविरुद्ध युद्ध पुकारले आहे. ही राष्ट्रीय एकता सरकारची सशस्त्र शाखा आहे १ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या लष्करी उठावाला प्रतिसाद म्हणून PDF तयार करण्यात आली आहे. लष्करी बळावर लढताना पुन्हा निवडून आलेल्या सरकारच्या माध्यमातून म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित करणे हा उद्देश असल्‍याचा दावा या संघटनेकडून केला जात आहे.

हेही वाचा :

 

Back to top button