Bhaubeej 2023 | दिवाळी पाडवा अन् भाऊबीज; जाणून घ्या शुभ मुहूर्त | पुढारी

Bhaubeej 2023 | दिवाळी पाडवा अन् भाऊबीज; जाणून घ्या शुभ मुहूर्त

- दाते पंचांगकर्ते, सोलापूर

वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसात होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. अशी ही आनंददायी, उत्साही, चैतन्य वाढवणारी दिवाळी ९ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. दिवाळीच्या या चार दिवसांत सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते. जाणून घेऊया बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) अन् भाऊबीजेचा शुभ मुहूर्त. (Bhaubeej 2023)

Bhaubeej 2023 : दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) – (14 नोव्हेंबर 2023, मंगळवार)

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरू होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरू होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते. (Bhaubeej 2023)

वहीपूजन मुहूर्त (14 नोव्हेंबर 2023, मंगळवार)

पहाटे 2:30 ते 5:30
सकाळी 6:45 ते 7:35
सकाळी 10:55 ते दुपारी 1:45

भाऊबीज (यमद्वितीया) – (15 नोव्हेंबर 2023, बुधवार)

नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे पुराणात सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button