ICC Team India: ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मधून भारताच्या खेळाडूंना डच्चू | पुढारी

ICC Team India: ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मधून भारताच्या खेळाडूंना डच्चू

दुबई, पुढारी ऑनलाईन : ICC Team India : टी-20 विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात टीम इंडियावर पाकिस्तानने 10 विकेट्स राखून मात केली. या पराभवाची जखम ताजी असतानाच टीम इंडियाला आणखी एका जबर धक्का बसला आहे. T20 विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर आयसीसी (ICC)ने सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. आयसीसीने या संघात एकाही भारतीय खेळाडूचा समावेश केलेला नाही. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली असून हा एक लाजिरवाणा दिवस असल्याची अनेकांनी टीका केली आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आयसीसीने आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने उपांत्य फेरी गाठली. संघाच्या या यशामध्ये कर्णधार बाबरने मोठा वाटा उचलला. त्‍याने एकूण स्पर्धेत सहा सामने खेळले. यात त्याने 60.60 च्या सरासरीने आणि 126.25 च्या स्ट्राईक रेटने 303 धावा फटकावल्या. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे.

भारताला सुपर-12 च्या पुढे प्रगती करता आली नाही

विराट सेना टी-20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपदक पटकावेल असा दावा अनेकांनी केला होता. पण टीम इंडियाने सलग दोन सामने गवावले पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. या पराभवाच्या दु:खातून सारा देश सावरलाही नाही की पुढच्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. तथापि, यानंतर कोहली अँड कंपनीने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया यांचा पराभव केला. पण उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करता आले नाही. अखेर गाशा गुंडाळून टीम इंडियाला मायदेशी परतावे लागले. टीम इंडियाच्या या कामगिरीने सर्वांची निराशा केली.

ICC च्या संघाची निवड अशी करण्यात आली…

इयान बिशप, शेन वॉटसन, नताली जर्मनोस, पत्रकार लॉरेन्स बूथ आणि पत्रकार शाहिद हाश्मी यांचा समावेश असलेल्या ICC पॅनेलने ICC च्या टी 20 संघातील खेळाडूंची निवड केली. T20 विश्वचषकातील सर्वोत्तम संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या. तर जसप्रीत बुमराहने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यंदाची स्पर्धा टीम इंडियासाठी खूपच निराशाजनक होती.

पाकिस्तान-न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाकडून पराभूत झाल्यानंतर भारताने फक्त अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाला पराभूत केले होते. यामुळेच भारत उपांत्य फेरी गाठू शकला नाही. वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे आयसीसी संघात तीन खेळाडू, तर बाबर आझम हा एकमेव पाकिस्तानी खेळाडू आहे. मात्र, पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीला 12 वा खेळाडू म्हणून स्थान मिळाले आहे.

आयसीसी टीम ऑफ द टूर्नामेंट अशी आहे…

1. डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – 289 धावा, 48.16 सरासरी
2. जोस बटलर (विकेटकीपर, इंग्लंड)- 269 धावा, 89.66 सरासरी, 5 विकेट्स
3. बाबर आजम, कर्णधार (पाकिस्तान)- 303 धावा, 60.60 सरासरी
4. चरिथ असालंका (श्रीलंका)- 231 धावा, 46.20 सरासरी
5. एडन मर्करम (द. आफ्रिका)- 162 धावा, 54.00 सरासरी
6. मोइन अली (इंग्लंड)- 92 धावा, 7 विकेट्स
7. वी. हसारंगा (श्रीलंका)- 16 विकेट, 9.75 सरासरी
8. ॲडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया)- 13 विकेट्स, 12.07 सरासरी
9. जोश हेजलवुड (ऑस्ट्रेलिया)- 11 विकेट्स, 15.90 सरासरी
10. ट्रेंट बोल्ट (न्यूजीलैंड)- 13 विकेट्स, 13.30 सरासरी
11. एनरिक नॉर्किया (साउथ अफ्रीका)- 9 विकेट्स, 11.55 सरासरी
12 वा खेळाडू – शाहीन आफ्रिदीए (पाकिस्तान)- 7 विकेट्स, 24.14 सरासरी

Back to top button