नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : छत्तीसगडमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव ॲपच्या संदर्भाने ईडी कारवाई करत आहे. निवडणूक काळात होत असलेली ईडी कारवाई म्हणजे संविधानाच्या मूळ ढाच्यावरच हल्ला आहे, असे म्हणत काँग्रेसने याप्रकरणी निवडणूक आयोगात धाव घेतली. निवडणुका चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, या प्रकरणात निवडणूक आयोगाने लक्ष घालावे, अशी याचिका निवडणूक आयोगात काँग्रेसने दाखल केली आहे.
काँग्रेसकडून निवडणूक आयोगात गेलेल्या शिष्टमंडळात वरिष्ठ विधिज्ज्ञ अभिषेक मनु सिंघवी, सरचिटणीस तारिक अन्वर, उदित राज होते. निवडणूक आयोगात याचिका दाखल केल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सिंघवी म्हणाले की, यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे काँग्रेसने पहिल्या टप्प्याचे मतदान होण्यापूर्वीच वेळ मागितला होता. मात्र निवडणूक आयोगाने त्यांना आजचा वेळ दिला. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाकडे महादेव ॲपच्या संदर्भात याचिका दाखल करण्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, महादेव ॲप संदर्भात छत्तीसगड सरकारने सर्वात मोठी कारवाई केली. ही कारवाई १८ महिने सुरू आहे. दरम्यान, संबधित बड्या लोकांना अटक करण्याची मागणी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली होती. आज देशाचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणाले की, महादेव ॲपवर परवा बंदी घातली गेली, कारण यापूर्वी कोणी मागणी केली नाही. मात्र मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यापूर्वीच तशी मागणी केली होती. याच प्रकरणावर ईडी म्हणते की, याची चौकशी करावी लागेल मात्र चौकशीपूर्वी वाटेल तिथे कारवाई सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी लोकांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र कशासाठी कारवाई होत आहे, याचे काहीही प्रमाण नाही. दरम्यान, ईडी म्हणजे भाजपचे इलेक्शन डिपार्टमेंट आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा :