पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपावली हा सण सर्वाधिक आनंद, ऊर्जा, स्फूर्ती देणार सण आहे. इतर सर्व सण उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसांत होणारे विधी, पूजा सर्वांनाच आनंद देणारे असतात, अशा या आनंददायी, उत्साही, चैतन्यदायी दिवाळीला गुरूवारपासून (दि.९) वसूबारसने सुरूवात होत आहे. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या बाराव्या प्रकाश दिवशी वसूबारस साजरा केला जातो. 'वसु' म्हणजे गाय आहे आणि 'बारस' म्हणजे बारावा दिवस. म्हणून वसु बारस हा शब्द प्रचलित झाला आहे. (Diwali 2023)
वसूबारस
या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे खालील श्लोक म्हणून सूर्यास्तानंतर पूजन करतात.
ततः सर्वमये देवी सर्व देवैरलंकृते ।
मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनी ॥
(अर्थ : हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.)
समुद्र मंथनातून पाच कामधेनूचा उदय झाला होता. त्यापैकी नंदा नामक धेनूच्या प्रीत्यर्थ हे व्रत केले जाते. या दिवशी मनोकामना पूर्ण होण्यासाठी वासरू, गायीची मनोभावे पूजा केली जाते. घरासमोर रांगोळी काढून स्त्रिया उपवास करतात. गाय वासरू यांना हळद लावून अंघोळ घातली जाते. अंगावर नवी झूल टाकली जाते. गहू, मूग न खाता स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. अन्नधान्य, दूधदुभत्यांची लयलूट व्हावी, कुटुंबात सुख-समाधान, समृद्धी, आरोग्य लाभावे, अशी मनोकामना केली जाते. दिवा, पणत्या लावून रोषणाई करून दिवाळी सणाचे जल्लोषात स्वागत केले जाते.
यंदाची दिवाळी गुरूवारपासून सुरू होत आहे. वसूबारस ९ नोव्हेंबररोजी गुरुवारी आहे. धनत्रयोदशी १० नोव्हेंबररोजी शुक्रवारी आहे. नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन १२ नोव्हेंबररोजी रविवारी एकाच दिवशी आलेले आहे. मध्ये एक दिवस सोडून १४ नोव्हेंबररोजी मंगळवारी दिवाळी पाडवा आणि दुसर्या दिवशी १५ नोव्हेंबररोजी बुधवारी भाऊबीज आहे.
हेही वाचा